Advertisement

राणीबागेत येणार नवा पाहुणा, पेंग्विन देणार गोड बातमी


राणीबागेत येणार नवा पाहुणा, पेंग्विन देणार गोड बातमी
SHARES

भायखळ्यातल्या वीरमाता जिजामाता भोसले उद्यानातील अर्थात राणीबागेतील प्राणी संग्रहालयात परदेशातून आलेले खास पाहुणे अर्थात आठ पेंग्विन गेल्या काही वर्षापासून गुण्यागोविंदानं नांदत आहेत. आता या पेंग्विनच्या गोतावळ्यात आणखी एका नव्या छोट्याशा पाहुण्याची लवकरच भर पडणार आहे. 

 मिस्टर माॅल्ट आणि त्याची पार्टनर फ्लिपर जोडी लवकरच आई-बाबा होणार आहेत. फ्लिपरनं गुरूवारी सकाळी अंड घातलं असून या अंड्यातून साधारणत ४० दिवसांनंतर एक गोंडस पेंग्विनचं पिल्लु बाहेर येईल. हे गोंडस पिल्लू भारतात जन्मला येणारं पहिलं पेंग्विन ठरणार आहे हे विशेष.


दक्षिण कोरीयातून पेंग्विन

दोन वर्षांपूर्वी दक्षिण कोरीयातून आठ पेंग्विन राणीबागेत आणण्यात आली. थंड वातावरणातच राहणारी, जगणारी ही पेंग्विन मुंबईतल्या वातावरणात तरणार का? हाच एकमेव प्रश्न त्यावेळी होता. पण या पेंग्विनसाठी राणीबाग प्रशासनासह मुंबई महानगर पालिकेनं वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवत त्यांच्यासाठी स्वतंत्र संरक्षित असा वातानुकूलित कक्ष तयार केला. या पेंग्विनची खास काळजी घेऊ जाऊ लागली नि बघता बघता पेंग्विन कधी मुंबईचे आणि मुंबई पेंग्विनची झाली हे कळेलच नाही.


सव्वा महिन्यांनी जन्म

आता याच पेंग्विनच्या गोतावळ्यात आणखी एक छोटासा पेंग्विन वाढणार आहे. फ्लिपरनं आता अंडे घातलं असून सध्या फ्लिपर अंड्याला पोटाखाली घेऊन ऊब देत आहे. त्यानुसार साधारणत ४० दिवसानंतर अंड्यातून पिल्लू बाहेर येण्यास लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं देशातला पहिला पेंग्विन जन्माला येण्यासाठी किमान सव्वा महिने वाट पाहावी लागणार असल्याची माहिती राणीबाग प्राणी संग्रहायलाचे संचालक डाॅ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.


अंड्यावर विशेष लक्ष 

 राणीबाग प्रशासन मात्र आतापासूनच या पेंग्विनच्या स्वागताच्या तयारीला लागलं आहे. जन्मानंतर पेंग्विनची विशेष काळजी घ्यावी लागणार असल्यानं त्याचीही तयारी दुसरीकडं प्रशासनानं सुरू केली आहे. तर डाॅक्टरही फ्लिपर आणि माॅल्ट या जोडीवर आणि अंड्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.


हेही वाचा -

यंदा 'या' धबधब्यांवर पर्यटकांना प्रवेश बंदी

अाशिष शेलार, जरा नागपुरातल्या तुंबईचाही शोध घ्या!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा