Advertisement

अाशिष शेलार, जरा नागपुरातल्या तुंबईचाही शोध घ्या!


अाशिष शेलार, जरा नागपुरातल्या तुंबईचाही शोध घ्या!
SHARES

नागपूरमध्ये अतिवृष्टीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालं. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुसळधार पावसामुळे विधीमंडळाचं कामकाज बंद पडलं. बत्ती गुल झाली. मात्र मुंबईत पाणी साचल्यानंतर भाजपचे अाशिष शेलार अाणि त्यांचा कंपू ज्याप्रमाणे कोल्हेकुई करून महापालिकेला जबाबदार ठरवतात, त्या अाशिष शेलारांनी जरा नागपुरातील महापालिकेलाही जबाबदार ठरवून त्यांच्या चौकशीची मागणी करावी, अशा शब्दांत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भाजपवर निशाणा साधला अाहे.


नागपूरमध्ये जिकडेतिकडे पाणीच पाणी

पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे सभागृहात वीजपुरवठा नसल्यानं कामकाज दिवसभरासाठी बंद करण्यात आलं. विधीमंडळाच्या परिसरामध्ये, आवारामध्ये जो काही पाऊस पडला, त्याचं पाणी ड्रेनेजच्या माध्यमातून, गटाराच्या माध्यमातून नीट न गेल्यामुळे गटारे तुंबली. नागपूर शहर जलमय झाल्यामुळे एरव्ही मुंबई महापालिकेवर टीकेचे अासूड अोढणाऱ्यांना भाजपवर हल्ला चढवण्याची संधी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोडली नाही.


मुख्यमंत्रीही टार्गेट

मुंबई महापालिका नालेसफाईचे काम करते. एवढेच नाही तर नालेसफाईच्या कामांवर देखरेख ठेवून काम करूनही घेते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच मी स्वतः जातीने नालेसफाईच्या कामांची पाहणी करत असतो. परंतु तशी जर नागपूर येथील नालेसफाई झाली की नाही, याची पाहणी जर पावसाळ्यापूर्वी केली असती तर नागपूरमध्ये नाले व गटारे तुंबली नसती आणि विधानसभेचे कामकाजही बंद पडलं नसतं, असा टोलाही मुंबईच्या महापौरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.


हे राज्याचं दुर्दैव

योगायोगानं विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्वी नागपूरचे महापौर होते. त्यानंतर आजही भाजपची सत्ता महापालिकेत आहे. त्यांच्याच पक्षाचा महापौर तिथे आहे. तरीही भाजपची सत्ता असलेल्या शहरात पाणी तुंबलं जातं आणि बत्तीही गुल होतं, यापेक्षा मोठं या राज्याचं दुर्दैव नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत हस्तक्षेप करण्यापेक्षा नागपूरमध्ये लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, अशा शब्दातही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कान टोचले.


शेलार तुम्हीही शोध घ्या

मुंबई ही सात बेटांची बनलेली असून समुद्र तसेच खाड्यांनी वेढलेली आहे. त्यामुळे मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता, काही भागांमध्ये भरती आणि पाऊस एकत्र असल्यास पाणी साचणारच. पण नागपुरात असं पाणी तुंबण्यासारखं काय, असा सवाल मुंबईच्या महापौरांनी केला आहे. थोडा पाऊस पडला तरी मुंबई तुंबली म्हणून भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अॅड. आशिष शेलार शिवसेनेवर उठसूठ टीका करतात. आता त्यांनी शुक्रवारी नागपुरात पाणी का तुंबले याचा शोध घ्यावा, असा टोलाही महापौरांनी लगावला.


फुटपट्टी बाहेर काढा

जी फुटपट्टी घेऊन मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली जाते, तशीच त्यांनी आता नागपुरातील नालेसफाईचीही पाहणी करावी, असंही आव्हान दिलं आहे. मुंबई तुंबली म्हणून महापालिकेची चौकशी करण्याची मागणी केली, त्याचप्रमाणे नागपुर का तुंबले याचीही चौकशी करण्याची मागणी अधिवेशानात करावी, असेही महापौरांनी म्हटले.


हेही वाचा -

महापौरांसह गटनेत्यांचा रशिया दौरा रद्द

मुंबईत पाणी तुंबलं, महापौरांनी नाही पाहिलं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा