Advertisement

मुख्यमंत्री म्हणतात, ''मुंबईत फक्त ४ हजार खड्डे''

मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झालेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत गेल्या वर्षीपेक्षा कमी खड्डे असल्याची माहिती विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री म्हणतात, ''मुंबईत फक्त ४ हजार खड्डे''
SHARES

सलग ४-५ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झालेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत गेल्या वर्षीपेक्षा कमी खड्डे असल्याची माहिती विधानसभेत दिली. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर प्रत्येक आपत्तीला मोठ्या धैर्याने सामोरे जाणाऱ्या मुंबईकरांची जणू चेष्टा करण्याचं सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांमधून उपस्थित होऊ लागला आहे.


मुंबईकरांमधून रोष

मंगळवारी पाऊस मुंबईला अक्षरश: झोडपून काढत असताना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मुंबईत अतिवृष्टीचा इशारा नसल्याचा ज्याप्रमाणे साक्षात्कार झाला होता, अगदी त्याचप्रमाणे मुंबईत गेल्या वर्षीपेक्षा कमी खड्डे असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी देताच मुंबईकरांमधून रोष व्यक्त होऊ लागला आहे.


जीवघेणे खड्डे

मुंबईच नव्हे, तर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि महानगर परिसरातील रस्त्यांवर हजारो खड्डे पडलेले असताना स्थानिक प्रशासन या खड्ड्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करताना दिसते. परिणामी या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवावरही बेतत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एकाच ठिकाणी खड्ड्यात बाइक घसरून दोन जणांचा जीव गेला होता.


काय म्हणाले मुख्यमंत्री?

नागपूर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुंबईतील रस्त्यांबाबतची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी शहरात केवळ ४ हजार ४४ खड्डे असल्याचं सांगितलं. मुंबई महापालिका शहरातील खड्ड्यांची संख्या कमी करण्यासाठी मुंबई आयआयटीची मदत घेत आहे. शिवाय खड्डे भरण्यासाठी 'कोल्ड मिक्स' तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


'असे' घटले खड्डे

२०१४-१५ मध्ये शहरात १४,४५५ खड्डे होते. तर २०१५-१६ मध्ये ५,३१६ खड्डे शहरातील रस्त्यांवर पडले होते. २०१६-१७ मध्ये खड्डे आणखी घटून ४,४७८ वर आले. त्यानंतर २०१७-१८ मध्ये खड्ड्यांची संख्या आणखी घटून ४,०४४ इतकी झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला.

मुंबई महापालिकेने हे खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत ९.३ कोटी रुपये खर्च केले असून ८०.७३ कोटी रुपयांचं कंत्राट रस्ते देखभाल आणि दुरूस्तीसाठी दिल्याचंही ते म्हणाले.



हेही वाचा-

मुंबई पाकिस्तानात आहे का? दूध रोखून दाखवाच - चंद्रकांत पाटील

स्वातंत्र्याच्या लढाईत ख्रिश्चन इंग्रजांच्या बाजूने, खासदार गोपाळ शेट्टींचं वादग्रस्त वक्तव्य



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा