Advertisement

अहो, आश्चर्यम्! तावडे म्हणतात, ''मुंबईत अतिवृष्टी नाही''


अहो, आश्चर्यम्! तावडे म्हणतात, ''मुंबईत अतिवृष्टी नाही''
SHARES

मागच्या ४ दिवसांत मुंबई महानगराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलेलं असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री महाशयांना मात्र मुंबईत अतिवृष्टीसारखी परिस्थिती नसल्याचं वाटत आहे. याला आश्चर्य नाही, तर दुसरं काय म्हणावं? शालेय शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी ''शाळांना सुट्टी देण्याची गरज नाही, कारण मुंबईत अतिवृष्टीसारखी परिस्थिती नाही'', असं म्हणताच मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली. तावडे यांनी नागपूर विधानभवनाबाहेर केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क सभागृहातच खुलासा करावा लागला. त्यानंतर जाग येऊन आवश्यकता असेल, त्यानुसार शाळांनी सुट्टीचा निर्णय घ्यावा, अशी सूचना शिक्षणमंत्र्यांनी केली.


अधिकृत सुट्टी नाही

अतिवृष्टीमुळे मुंबईत जागोजागी पाणी साचलेलं असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाने सोमवारी मुंबई महानगरातील सर्व शाळा-काॅलेजांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र मंगळवारीही जोरदार पाऊस पडत असताना देखील सरकारकडून अधिकृतरित्या सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. काही शाळांनी सुट्टीचा निर्णय स्वत:च घेतला, तर काही पालकांनी मुलांना शाळेत पाठवलं नाही. सुट्टीबाबत बहुतांश पालक गोंधळात असल्याने त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्रश्न विचारण्यात आला.


काय म्हणाले तावडे?

त्यावर उत्तर देताना तावडे म्हणाले, ''मुंबईत अतिवृष्टीचा इशारा नाही. सकाळी ८.३० वाजता भरती होती, तिची वेळही निघून गेली आहे. पाणी साचून विद्यार्थी अडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे कालप्रमाणे आज तात्काळ सुट्टीची घोषणा करण्याची गरज वाटत नाही. मुंबईत फक्त मुसळधार पाऊस आहे. कोणत्याही प्रकारची  ढगफुटी झालेली नाही. विरोधकांनी जनतेत भीती पसरवू नये. आम्ही परिस्थितीवर  लक्ष ठेवून आहोत. आवश्यकता वाटल्यास सर्व मत्रिमंडळ मुंबईत जाऊ शकतं.''


शेलारांचा घरचा आहेर

तावडे यांच्या विधानावर मुंबईकरांमधून संताप व्यक्त होऊ लागताच, त्याचे पडसाद नागपूर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही पडले. ही बाब लक्षात घेऊन भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी तावडे यांना घरचा आहेर देत, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबईतील शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली.


मुख्यमंत्र्यांचा खुलासा

मुंबईतील स्थितीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ११ ठिकाणी पाणी साचल्याची माहिती विधानसभेत दिली. सोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचीही सूचना तावडे यांना केली. ज्या ११ वी १२ वीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेचा पावसामुळे खोळंबा झाला, त्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रियेची मुदत वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली.



हेही वाचा-

पावसाचं लाइव्ह अपडेट बघण्यासाठी इथं क्लिक करा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा