मुख्याध्यापकांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट

 Mantralaya
मुख्याध्यापकांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट

एका शाळेला एक मुख्याध्यापक या ऐवजी 100 विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापक हा नवीन नियम राज्य शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संचमान्यतेनुसार आणण्यात आला आहे. या नियमानुसार अनेक शाळांमधील मुख्याध्यापक पदं रद्द करण्यात आली आहेत. या नवीन नियमानुसार मुख्याध्यापकांची पदं धोक्यात आली आहेत. या पदांना संरक्षण मिळावे यासाठी मंगळवारी राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. या नियमामुळे अनेक शाळांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी अशी मागणी त्यांनी यावेळी शिक्षणमंत्र्यांकडे केली.

'आम्ही शिक्षणमंत्र्यांना याविषयी रितसर पत्र दिले आहे. मुख्याधापक पद रद्द करू नये. पदाला संरक्षण द्यावे अशी मागणी आम्ही केली. संचमान्यतेमध्ये मुख्याध्यापक पदाच्या संरक्षणाबद्दल कोणतीच नोंद नसल्याचं आम्ही शिक्षणमंत्री विनोद तावडेंना सांगितल्याचे राज्य मुख्याध्यापक संघटनेचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी सांगितले. संघटनेच्या मागणीवर लवकरात लवकर अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असं अाश्वासन तावडे यांनी यावेळी दिलं.

Loading Comments