Advertisement

विद्यापीठांच्या विविध परीक्षांना आजपासून सुरुवात


विद्यापीठांच्या विविध परीक्षांना आजपासून सुरुवात
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या २०१८ च्या दुसऱ्या म्हणजेच हिवाळी सत्राच्या परीक्षा ४ ऑक्टोबर गुरुवारपासून सुरू होत आहेत. या परीक्षांवर प्राध्यापक संपाचा परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत असली तरी देखील प्राध्यापकांनी परीक्षा कालावधीत सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे या सर्व परीक्षा सुरळीत पार पडणार आहेत.


एकूण ३१ परीक्षा

गुरुवारी होणाऱ्या परीक्षांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या ७, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या १७, मानव्य शाखेच्या तीन आणि आंतरविद्या शाखेच्या ४ अशा ३१ परीक्षा होणार आहेत. या परीक्षेत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी विद्यापीठाने सर्व तयारी केली आहे.

प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी बंद पुकारल्याने या परीक्षांवर परिणाम होण्याची शक्‍यता होती. मात्र, परीक्षांच्या कामांमध्ये प्राध्यापक सहभागी होणार असल्याचं बुक्‍टू संघटनेच्या सचिव मधू परांजपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे विद्यापीठाच्या या सर्व परीक्षा सुरळीत पार पडण्याची शक्‍यता आहे.


संगणकीय उपस्थिती

या परीक्षेमध्ये प्रथमच विद्यार्थ्यांची संगणकीय उपस्थिती होणार असून या परीक्षेत उत्तरपुस्तिकेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर दिव्यांग हा रबरी स्टॅम्प कशा पद्धतीने मारण्यात यावा, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या परीक्षेची माहिती कशाप्रकारे ठेवावी याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले असून विद्यापीठाने शिक्षकांना विविध माहिती देणारे मोबाइल अॅपही तयार केले आहे.

या अॅपद्वारे शिक्षकांना त्यांच्या नावावर तपासण्यासाठी आलेल्या उत्तरपत्रिकांचा लेखाजोखा पाहावयास मिळणार आहे. यामुळे सर्व परीक्षा सुरळीत पार पडतील याची खात्री आहे, असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा