Advertisement

डी. एस. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचं 'तिरकिट धा'!


डी. एस. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचं 'तिरकिट धा'!
SHARES

शाळेचा वर्ग आणि वर्गात विद्यार्थी पियानो वाजवत आहेत! बाॅलिवूडचे ख्यातनाम गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्याकडून गायन-संगीताचे धडे गिरवत आहेत! मेघना गुलझार यांच्या आगामी हिंदी सिनेमासाठी पार्श्वगायन करत आहेत! कशी वाटतेय कल्पनेतली शाळा? खरं वाटत नाही ना? पण ही कल्पना नसून वास्तव आहे. सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमध्ये हे सारं काही घडत आहे. मुलं अभ्यासासोबतच संगीताचे धडे गिरवत आहेत.



शंकर महादेवनकडून संगीताचे धडे

विविध उपक्रम राबवण्यात आघाडीवर असणाऱ्या डी. एस. हायस्कूलचा हा एक नवीन उपक्रम आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगीताचे विशेष वर्ग आयोजित केले जातात. गायन-वादनाची विशेष आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतच शंकर महादेवन अकादमीच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. हार्मोनियम, तबला, गिटार, पियानो याच्यासह अनेक वाद्यांनी युक्त अत्याधुनिक अशी साऊंड सिस्टीम यांनी शाळेचा संगीतवर्ग सुसज्ज आहे.


आमच्या शाळेत येणारी मुलं गरीब वर्गातून येत असली, तरी त्यांना उत्कृष्ट दर्जाचं संगीत-शिक्षण मिळावं, यासाठी आम्ही हा उपक्रम गेल्या वर्षीपासून राबवत आहोत. शंकर महादेवन अकादमीचे तज्ज्ञ संगीतशिक्षक शाळेत येऊन विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्ग घेतात.

राजेंद्र प्रधान, विश्वस्त, शिवशिक्षण संस्था


शास्त्रीय संगीताचे धडे

गिटार, पियानो, तबला, हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीत यांचं रीसतर प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शाळेतच उपलब्ध दिलं जात आहे. या प्रशिक्षणानंतर निवड झालेले विद्यार्थी पुण्यातलं गंधर्व विद्यालय, तसंच लंडनच्या ट्रिनिटी काॅलेजमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी पात्र ठरणार आहेत. शाळेतील तीन हजार विद्यार्थ्यांसाठी संगीताचे वर्ग नियमितपणे भरत असून त्यातून निवडलेल्या १५० विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती येथील शिक्षकांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा