Advertisement

सांताक्लॉज बनून तंत्रज्ञानाचं गिफ्ट समाजाला द्या - सुरेश प्रभू


सांताक्लॉज बनून तंत्रज्ञानाचं गिफ्ट समाजाला द्या - सुरेश प्रभू
SHARES

टेकप्रेमींसाठी अगदी जिव्हाळ्याचा फेस्ट म्हणजे वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूटचा (व्हीजेटीआय) ‘टेक्नोवांझा’! २५ ते २८ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या आणि तंत्रज्ञानावर आधारलेल्या या फेस्टचं उद्घाटन सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं. आजच्या दैनंदिन जीवनात आपण समाजाला काहीतरी चांगलं देऊन ऋण फेडण्याची आवश्यकता आहे. ख्रिस्तमसच्या निमित्ताने समाज बदलण्याची ताकद असणाऱ्यांनी रियल लाईफ सांताक्लॉज बनून समाजाला गिफ्ट द्यायची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली. जागतिक स्तरावर आपल्या अस्तितत्वाची छाप उमटवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं.


तंत्रज्ञान-नैसर्गिक स्रोतांचा ताळमेळ आवश्यक

लोकसंख्येच्या क्रमांकानुसार जागतिक स्तरावर भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याने निसर्ग आणि वाढती लोकसंख्या यांच्यात तंत्रज्ञानाचा वापर करून समन्वय साधण्याची मोठी जबाबदारी भारतावर असल्याचे सुरेश प्रभू यांनी अधोरेखित केली. निसर्गाकडून माणसाची गरज भागेल इतका पुरवठा होत आहे. मात्र माणसाची हाव काही संपत नाही. प्रत्येक गोष्टीची एक क्षमता असते तशीच ती आपल्या ग्रहाचीही आहे हे लक्षात घेणे गरजेचं आहे. याच क्षमतेवर आपली आर्थिक क्षमताही अवलंबून असते. आपण नैसर्गिक स्रोतांचा जितका अधिक आणि योग्य वापर करू त्यावर आपल्या जीवन जगण्याचा दर्जाही अवलंबून आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून नैसर्गिक स्रोतांचा योग्य ताळमेळ राखला गेला पाहिजे, असा सल्ला सुरेश प्रभू यांनी व्हीजेटीआयमधल्या तरुणांना दिला.


कॅटलायझिंग इनोव्हेशनचा उद्देश

तंत्रज्ञानाचा वापर वेगळ्या गोष्टींसाठी नव्हे, तर योग्य पद्धतीने करावा. सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा वापर व्हायला हवा. स्वच्छ पाणी हवा यावर सगळ्यांचा अधिकार आहे. झपाट्यानं बदलणारं तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांच्याबद्दल चर्चा करताना ज्याने यातील बदल स्वीकारले तेच खरे विजेते असंही प्रभू यांनी स्पष्ट केले.


तंत्रज्ञान म्हणजे 'यांचा' मिलाफ

भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते आणि पुढच्या ८ ते १० वर्षांत अर्थव्यवस्थेचा दर आणखी झपाट्याने वाढणार असल्याचं सूतोवाच त्यांनी केलं. तंत्रज्ञानाचा वापर फक्त प्रयोगशाळेतील प्रयोगांकरता न होता समाजात बदल घडवून आणण्यासाठी किंवा समाजोपयोगासाठी व्हावा, असं प्रभू यांनी सुचवलं.


तंत्रज्ञान, समाज जीवन आणि अर्थव्यवस्था यांचा योग्य मिलाफ म्हणजे नवीन शोध असतो आणि त्याचा वापर माणसाच्या चांगल्या जीवनासाठी व्हायला हवा. शेवटी आव्हानं ही माणसाच्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी असतात. बऱ्याचदा त्यातून त्याचे सगळ्यात मोठे आणि चांगले शोध लागतात हेच दिसून आल्याचे सांगत त्यांनी व्हीजेटीआयमधील तरुणांना तंत्रज्ञानाचं महत्त्व समजावून सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा