शुल्कवाढीविरोधात पालक घेणार शिक्षणमंत्र्यांची भेट

  Mumbai
  शुल्कवाढीविरोधात पालक घेणार शिक्षणमंत्र्यांची भेट
  मुंबई  -  

  मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करून पालकांना लुटणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र त्यांच्या आश्वासनानुसार अद्याप कोणत्याच शाळांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शुल्कवाढीविरोधात पुन्हा एकदा शिक्षणमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  याआधी 21 एप्रिलला शुल्कवाढीविरोधात पालकांनी आझाद मैदानात आंदोलन केलं होतं. त्याची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी अशा शाळांवर लवकरच कारवाई करण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. तरीही मनमानी कारभार करणाऱ्या शाळांवर कारवाई न झाल्यामुळे पालक निराश झाले आहेत.

  शाळांना दरवर्षी शुल्कवाढ करण्याची परवानगी नाही. शुल्कवाढ करण्याअगोदर शाळांची 'पेरेंट्स टीचर असोसिएशन' (PTI) बरोबर बैठक होणे गरजेचे असते. या बैठकीत शुल्क वाढीला मान्यता मिळाल्यानंतरच शाळा शुल्कवाढ करू शकते. या आधी शुल्कवाढीविरोधात पालकांनी शिक्षण विभागाला अनेकदा पत्रही दिली. मात्र कुठल्याही शाळांवर कारवाई झाली नाही. पालकांनी एकत्र येऊन अनेकदा तक्रारीही केल्या. मात्र त्याकडे शिक्षण विभागाने कायमच दुर्लक्ष केलं. त्यामुळे आम्ही निराश झालो असून, नाईलाजाने पुन्हा एकदा शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहोत असं पालक तेजस्विनी पुरंदरे यांनी सांगितलं. मनमानी कारभार करणाऱ्या शाळांवर अंकुश ठेवण्याची मागणी करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.