दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलं आहे. बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलला सुरु होणार आहे. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलं आहे.

दरवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये होतात. कोरोनामुळे यंदा परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. राज्य शासनाने मान्यता दिल्यानुसार आता वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आलं आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दरवर्षी परिक्षा घेण्यात येते.

कोरोनामुळे परीक्षा उशीराने घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्य मंडळाने विद्यार्थ्यांसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान घेण्यात येणार आहे. तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ पर्यंत घेतली जाणार आहे.

सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.संभाव्य वेळापत्रकाबाबत विद्यार्थी पालकांना काही हरकती किंवा सूचना असल्यास २२ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरुपात बोर्डाला कळविण्यात यावे. तसेच बोर्डाने वेबसाईटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकाशिवाय विद्यार्थी पालकांनी इतर कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांना तिसरी संधी

लसीकरणासाठी २० खासगी रुग्णालयांना परवानगी