Advertisement

शाळकरी मुलं घेणार प्रदूषण मुक्तीची शपथ!


शाळकरी मुलं घेणार प्रदूषण मुक्तीची शपथ!
SHARES

दिवाळी म्हणजे दीपोत्सव. दिवाळीत फटाके फोडून नाही तर दिवे लावून साजरे करायचे असतात. मात्र गेली काही वर्ष आपण मुख्य 'दिवाळी' ही संकल्पनाच विसरलो आहोत. हल्ली दिवळी म्हटलं की 'फटाके फोडणं'. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सारेच हे प्रदूषण वाढवणारे फटाके फोडण्यात गर्क असतात. फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण थांबावं यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक परिपत्रकच काढले आहे.

दिवाळीच्या दिवसात ध्वनी आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असतं. यासाठी शालेय जीवनापासूनच जनजागृती होणं नितांत गरजेचं आहे. यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानातून विद्यार्थ्यांना 'यावर्षी आम्ही फटाके उडवणार नाही' अशी शपथ देण्यात येणार आहे.


अशी आहे शपथ...

भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. सर्व सामान्य नागरिकांना निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरण जगण्यासाठी कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ व पर्यावरणाचा समतोल राखू.

आम्ही सर्वजण असा ही संकल्प करतो की, समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरिता आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लावू व त्याचे नित्यनियमाने संगोपन करू.

दिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यांचा तेजोमय प्रकाश, या दिवाळीत फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होणार नाही, याकरिता फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत.

आम्ही भारताचे भविष्यातील समर्थ नागरिक म्हणून शपथ घेतो की, वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी कटीबद्ध राहू.

अशी शपथ उद्या मंगळवारी सर्व शाळांमध्ये विद्यार्थी घेणार आहेत. ही शपथ घेतल्यानंतर या वर्षीतरी मुंबईत दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी होईल, यात शंका नाही.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा