Advertisement

मुलगा शाळेत जातोय की भटकतोय? पालकांना घरबसल्या कळणार


मुलगा शाळेत जातोय की भटकतोय? पालकांना घरबसल्या कळणार
SHARES

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना स्मार्ट ट्रॅकिंग चिप आणि ट्रान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड देण्याची मागणी नगरसेवकांडून होत आहे. हे कार्ड दिल्यानंतर विद्यार्थी शाळेत न आल्यास किंवा हरवल्यास या ओळ्खपत्राच्या साहाय्याने पालक किंवा शाळेतील शिक्षकांना विद्यार्थी नेमका कुठे आहे? याची माहिती मिळेल. 


ठरावाच्या सुचनेद्वारे मागणी

एका बाजूला पटसंख्या वाढवण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूमसह ३१ शालेय वस्तू आणि सेवा देतानाच दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही प्रयत्न होत आहे, हे विशेष. महापालिका शाळांमधील विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याच्या शिक्षणावर परिणाम होतो. परिणामी महापालिका शाळांचा दर्जाही खालावतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी स्मार्ट ट्रॅकींग आयकार्ड देण्याची मागणी शिवसेना नगरसेविका समृद्धी काते यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.


विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

महापालिका शाळांमध्ये शिकण्यास येणारे बहुतांश विद्यार्थी झोपडपट्टी भागातून येतात. ते आर्थिक दुर्बल कुटुंबातील असतात. शैक्षणिक वातावरणाचा अभाव आणि गरीबी अशा दुहेरी कारणांमुळे या मुलांमध्ये शिक्षणाची आवड नसते. म्हणून ही मुले शाळेकडे फिरकत नाहीत. त्यामुळे महापालिका शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचं दिसून येत आहे. या मुलांनी शाळांकडे आकर्षित व्हावं, त्यांना शिक्षणाची आवड लागावी, यासाठी मागील काही वर्षांपासून या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून मोफत शैक्षणिक साहित्य, टॅब उपलब्ध करून दिलं जात आहे. 


ठराव पुढील बैठकीत 

शैक्षणिक साहित्य देऊनही हे विद्यार्थी बऱ्याच वेळेस शाळेत जाण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडतात, परंतु शाळेत न जाता बाहेर भटकत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या प्रकाराची मुलांच्या पालकांना कुठलीही कल्पना नसते. आपलं मुलं शाळेत आहे, असं पालकांना वाटतं. पण प्रत्यक्षात तो विद्यार्थी शाळेत गेलेलाच नसतो. शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी तक्रार केल्यानंतर ही वस्तुस्थिती पुढे येते.

अशा मुलांचं ट्रॅकिंग करणं ही आवश्यक बाब ठरली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना स्मार्ट ट्रॅकिंग चिप आणि ट्रान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड देण्याची मागणी आपण महापालिकेकडे केल्याचं समृद्धी काते यांनी स्पष्ट केलं. पुढील महापालिका सभागृहाच्या बैठकीत याबाबतचा ठराव केला जाणार आहे.



हेही वाचा-

महापालिका शाळांतील विद्यार्थी खाणार चणे, शेंगदाणे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा