Advertisement

महापालिका शाळांतील विद्यार्थी खाणार चणे, शेंगदाणे


महापालिका शाळांतील विद्यार्थी खाणार चणे, शेंगदाणे
SHARES

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थी तासांदरम्यान चणे, शेंगदाणे चघळताना दिसल्यास नवल वाटून घेऊ नका. कारण महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुगंधी दूध, चिक्कीऐवजी आता चणे, शेंगदाणे देण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेने यापूर्वी विद्यार्थ्यांना सुगंधित दुधाऐवजी चिक्की देण्याचा निर्णय घेतला होता खरा, पण चिक्कीचा पुरवठा करण्यासाठी एकही कंत्राटदार पुढे न आल्यानं महापालिकेनं हा प्रस्तावच गुंडाळून ठेवला आहे. चिक्की नाही, तर मग विद्यार्थ्यांना काय देणार? असा विचार
करून प्रशासनानं सुरू केलेला पर्यायी पोषक आहाराचा शोध चणे, शेंगदाण्यावर येऊन थांबला.


सुगंधी दुधाचा धसका

महापालिकेने २००७-०८ पासून २७ शालेय वस्तूंसोबत विद्यार्थ्यांना सुगंधीत दूध देण्यास सुरूवात केली होती. पण सुगंधित दूध पिऊन अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं महापालिकेनं तात्काळ हा दूध पुरवठा थांबवला. त्यानंतर काही काळानं पुन्हा दुधाचं वाटप सुरु करण्यात आलं. पण पुन्हा ठिकठिकाणी विषबाधेचे प्रकार होऊ लागल्यानं महापालिकेनं सुगंधी दुधाचा धसका घेऊन दूध वाटप कायमचे बंद केले. दुधाला पर्याय म्हणून नंतर चिक्की देण्याचा निर्णय घेण्यात आला.


चिक्कीचा प्रयत्न असा फसला

चिक्कीचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेनं २०१२-१३ पासून चार वेळा निविदा मागवल्या. पण या निविदेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. हल्दीराम फुड्स इंटरनॅशनल, सृष्टी महिला उद्योग आणि प्रॉम्प्ट टॉईज या तीन कंपन्यांनी निविदांत भाग घेतला होता. यातील सृष्टी महिला उद्योगकडे पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. चिक्की साठवणुकीचे गोदामही नव्हते, तर प्रॉम्प्ट टॉईजकडे चिक्की उत्पादनाचा कोणताही अनुभव नव्हता. हल्दीराम कंपनी पूर्णपणे चिक्कीचे उत्पादन मशिनद्वारे करत नसून त्यांना शासकीय संस्थांना पुरवठा करण्याचा अनुभव नसल्याने या सर्व कंपन्या निविदा प्रक्रियेतून बाद झाल्या.


पर्यायी पोषक आहाराचा शोध

इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना ३० ग्रॅम आणि चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४० ग्रॅम चिक्की देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी दरदिवशी १५ टन चिक्कीचा पुरवठा होणे अपेक्षित होते. याबाबत उपायुक्त (शिक्षण) मिलिंद सावंत यांना विचारले असता त्यांनी, तूर्तास चिक्कीचा विषय बाजूला ठेवून चिक्की ऐवजी पर्यायी पोषक आहार म्हणून चणे व शेंगदाणे देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.


प्रस्ताव लवकरच मान्यतेसाठी

चणे, शेंगदाणे खाण्याची सवय बहुतांश मुलांना असते. चणे, शेंगदाणे पचनास चांगले असतात. ते खाल्ल्याने आरोग्याचा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना चणे व शेंगदाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या मान्यतेसाठी पाठवला जाईल, असे सावंत यांनी सांगितले. शाळांमध्ये मुलांना मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यामुळे हे चणे व शेंगदाणे मुलांना घरी जाताना दिले जातील. त्यामुळे घरी गेल्यानंतरही मुलांना पोषक आहार मिळेल, असे त्यांनी सांगितले.



हे देखील वाचा -

अगा जे घडलेच नाही...?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा