Advertisement

महापालिकेने चिक्कीचा नाद सोडला!


महापालिकेने चिक्कीचा नाद सोडला!
SHARES

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सुगंधित दुधाऐवजी चिक्की देण्याचा निर्णय घेणाऱ्या महापालिकेने आता चिक्कीचा विषयच डोक्यातून काढून टाकला आहे. महापालिकेकडे चिक्कीचा पुरवठा करण्यासाठी एकही कंत्राटदार पुढे न आल्यामुळे अखेर चिक्कीचा प्रस्तावच गुंडाळून ठेवत महापालिकेने हा नादच सोडला आहे. त्यामुळे आस लावून बसणाऱ्या महापालिका शालेय विद्यार्थ्यांना चिक्की विसरावी लागणार आहे. या चिक्की ऐवजी पर्यायी पोषक खाद्याचा पुरवठा करण्याचा शोध सुरु असून आता त्यांच्या हाती चणे-शेंगदाणे पडतात की काय हाच प्रश्न उपस्थित होत आहे.


सुगंधी दुधाला पर्याय होता चिक्की

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सन २००७-०८ पासून २७ शालेय वस्तूंसोबत सुगंधित दुधाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महापालिका शाळांमधील मुलांना सुगंधित दुधाचा पुरवठा करण्यात आला. परंतु पुढे सुगंधित दूध प्यायल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. त्यानंतर या दुधाचा पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा दुधाचे वाटप सुरु करण्यात आले. पण त्यानंतरही विषबाधेचे प्रकार घडल्यामुळे दुधाचे वाटप बंद करण्यात आले. तसेच, राज्यभरात गाजलेला चिक्की घोटाळा या प्रक्रियेमध्ये मोठी अडचण निर्माण करणारा ठरला.


बड्या कंपन्याही ठरल्या बाद

सुगंधित दूध बंद करण्यात आल्यामुळे सन २०१२-१३ पासून पर्याय म्हणून चिक्कीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण या चिक्कीसाठी तब्बल चार वेळा निविदा मागवूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. हल्दीराम फुड़स इंटरनॅशनल, सृष्टी महिला उद्योग आणि प्रॉम्प्ट टॉईज या तीन कंपन्यांनी आतापर्यंत भाग घेतला होता. यातील सृष्टी महिला उद्योग यांच्याकडे पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. तसेच चिक्की साठवणुकीचे गोदामही नव्हते, तर प्रॉम्प्ट टॉईज यांच्याकडे चिक्की उत्पादनाचा कोणताही अनुभव नव्हता. तसेच हल्दीराम ही कंपनी पूर्णपणे चिक्कीचे उत्पादन मशिनद्वारे करत नाही, तसेच त्यांना शासकीय संस्थांना पुरवठा करण्याचा अनुभव नाही . त्यामुळे या सर्व कंपन्या बाद झाल्या आहेत.


दररोज १५ टन चिक्कीचा पुरवठा

महापालिका शाळांमध्ये दरदिवशी १५ टन एवढ्या चिक्कीचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे शहर व उपनगरे असा स्वतंत्रपणे चिक्कीचा पुरवठा करण्यासाठी कंपन्यांची निवड करण्याचा निर्णय निविदा समितीने घेतला होता. परंतु, ज्या कंपन्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता, त्यांची पाच टन चिक्कीचा पुरवठा करण्याचीही क्षमता नव्हती. लोणावळा येथील मगनभाईची चिक्की प्रसिद्ध असली, तरी मुंबई महापालिकेला मोठय़ा प्रमाणात चिक्की पुरवण्याची त्यांची क्षमता नसल्याने, तसेच महापालिकेबद्दल त्यांचा वाईट अनुभव असल्यामुळे या निविदांमध्ये त्यांनी भाग घेतला नसल्याचे बोलले जात आहे.


चिक्की म्हणताच शिक्षणाधिकाऱ्यांचा कानांवर हात! 

दरनिश्चिती न करता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडीतील बालकांसाठी चिक्कीचे कंत्राट दिल्यामुळे २०६ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राज्यात गाजला.

परंतु, राज्य सरकारला चिक्कीचे पुरवठादार मिळाले तरी महापालिकेला चिक्की पुरवणा-या कंपन्याच सापडत नसल्याचे उघड झाले आहे. शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना चिक्कीच्या पुरवठ्याबाबत विचारले असता, त्यांनी 'एवढा मोठा चिक्की घोटाळा झाला आहे, हे आपण पाहिलेत. मग आता कशाला हवी चिक्की?' असा उलट सवाल केला.


पर्यायांचा शोध

मुंबई महापालिका इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना ३० ग्रॅम आणि चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४० ग्रॅम चिक्की पुरवण्याचा निर्णय घेतला. यासाठी दरदिवशी १५ टन चिक्कीचा पुरवठा होणे अपेक्षित होते. पण याबाबत उपायुक्त (शिक्षण) मिलीन सावंत यांना विचारले असता त्यांनी, तूर्तास चिक्कीचा विषय बाजूला ठेवला असल्याचे सांगितले. चिक्की ऐवजी पर्यायी पोषक आहाराचा शोध सुरु आहे. त्यामुळे चिक्की ऐवजी काय देता येईल? याची शक्यता पडताळून पाहून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


चणे-शेंगदाणे पडणार हाती!

चिक्कीला पर्याय म्हणून अन्य पोषक आहाराचा शोध घेतला जात असताना महापालिका शाळांमधील मुलांना चणे-शेंगदाणे खाण्यास देण्याचा विचार सुरु असल्याची कुजबुज शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे. मुलांना चणे आणि शेंगदाणे खाण्यास दिल्यास यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत नाही, तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे दोन्ही प्रकार योग्य असल्याचे शिक्षण विभागाचे मत बनले आहे. मात्र, अद्यापही यावर शिक्कामोर्तब झालेले नसून चिक्कीनंतर याचा विचार होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात, या वस्तू मुलांना घरी घेऊन जाऊन खाता येऊ शकतात, असे शिक्षण विभागाच्या काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


चिक्की अडकली कोणत्या दाढेत?

  • दरदिवशी १५ टन चिक्कीचा पुरवठा न करण्याची क्षमता
  • किमान ५ टन चिक्की उत्पादन व पुरवठा न करण्याची क्षमता
  • चिक्कीवर हायड्रोजन फ्लो रॅपिंग असणे
  • चिक्कीवर एमसीजीएम असे ऍम्बॉसिंग करणे
  • चिक्कीचे उत्पादन पूर्णपणे मशिनद्वारे करणे




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा