Advertisement

शिक्षकांनो तुमच्यासाठी 'या' विशेषांकाची निर्मिती!


शिक्षकांनो तुमच्यासाठी 'या' विशेषांकाची निर्मिती!
SHARES

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे फक्त शाहीरच नव्हे, तर कथाकार आणि कादंबरीकारही होते. आता त्यांच्या साहित्याचं दर्शन मुंबईसह राज्यातील शिक्षकांना व्हावं, यासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघानं पुढाकार घेतला असून लवकरच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य विशेषांकाची निर्मिती केली जाणार आहे. या विशेषांकाचं प्रकाशन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार असल्याचं मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी सांगितलं.


या शिक्षकांनी केलं लेखन

महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ मागील २८ वर्षांपासून शिक्षकांसाठी त्रैमासिक चालवत असून डिसेंबर महिन्याचा अंक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित आहे. विशेष म्हणजे राज्यातील शिक्षकांनी या अंकात लेखन केलं आहे. 

यामध्ये धरणगाव येथील पी. आर. हायस्कुलचे शिक्षक डॉ. संजीवकुमार सोनावणे यांनी अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील श्री महालक्ष्मी हायस्कुलच्या सुरेखा कांबळे, सोलापूर येथील सिद्धेश्वर प्रशालेचे राजकुमार उंबरजे, पुणे येथील प्रा. राजकुवर सोनावणे, कोल्हापूरचे बी. एस. कांबळे, नागपूरच्या शोभा शेळके-तायडे, अहमदनगरचे आर. एन. सुबे, महाबळेश्वरच्या रोहिणी माळवदे, मुंबईच्या सुनीता भगवते आणि साताऱ्याच्या उज्वला लांडगे या शिक्षकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. या विशेषांकाचे संपादक बा. ग. यादव असून कार्यकारी संपादक विजयकुमार लांडगे आहेत.


या विशेषांकात काय?

या विशेषांकात अण्णा भाऊ साठेंचे प्रवासवर्णन, कादंबऱ्या, यासह शिक्षकांना मार्गदर्शन ठरेल असे लेख आहेत. पाठ्यपुस्तकातून अनेकदा गद्य-पद्य स्वरुपात अण्णा भाऊंचे साहित्य आले असून शिक्षकांना अध्यापनात हा विशेषांक उपयुक्त असल्याचे मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी सांगितलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा