Advertisement

हिवाळी अधिवेशनावर आता शिक्षकांचा हल्लाबोल


हिवाळी अधिवेशनावर आता शिक्षकांचा हल्लाबोल
SHARES

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक परिषदेच्या वतीने नागपूर अधिवेशनावर १३ ते १५ डिसेंबरपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक परिषेदेने दिली आहे.

शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठणकर, महिला आघाडी अध्यक्षा पूजा चौधरी, शिक्षक आमदार नागो गाणार, माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर व भगवान साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत.


काय आहेत मागण्या ?

जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग तातडीने द्यावा, अनुदानास पात्र घोषित व अघोषित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावं, वरिष्ठ व निवडश्रेणीचा २३ ऑक्टोबरच्या शासन निर्णयातील जाचक अटी रद्द कराव्यात, १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, ऑनलाईन कामासाठी स्वतंत्र शिक्षक नेमावा, कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी, पदवीधर ग्रंथपालांना पदवीधरची वेतनश्रेणी द्यावी, शिक्षकेतरांचा आकृतिबंध घोषित करावा, रात्रशाळेतील शिक्षकांना पूर्णवेळचा दर्जा देऊन वेतन सुरू करावे, आयसीटी शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावं, शाळांची वीज देयके घरगुती दराने आकारावीत यासह अन्य प्रश्नांबाबत हे धरणे आंदोलन होणार असल्याचं अनिल बोरनारे यांनी सांगितलं.

या महत्त्वाच्या प्रश्नांसह प्राथमिक-माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांचे विविध प्रश्न शासनाने तातडीने सोडविण्यासाठी शिक्षक परिषद सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या सर्व प्रलंबित प्रश्नांवर राज्य सरकारला जाब विचारण्यात येणार असून त्या सर्व मान्य कराव्यात, असा आग्रह या आंदोलनाच्या माध्यमातून धरला जाणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा