Advertisement

'हक्काचं अनुदान द्या', शिक्षकांनी छेडलंय शिक्षणमंत्र्यांसोबत 'मोबाईल वाॅर'


'हक्काचं अनुदान द्या', शिक्षकांनी छेडलंय शिक्षणमंत्र्यांसोबत 'मोबाईल वाॅर'
SHARES

आपला हक्क आणि अनुदान मिळवण्यासाठी आता शिक्षकांनी चांगलीच शक्कल लढवली आहे. राज्यातील शिक्षकांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मोबाईलवर 'मेसेज वॉर' आंदोलन सुरू केलं आहे. ''आमच्या हक्काचे १००% अनुदान द्या, आम्हाला सेवेत कायम करा'', असे मेसेज हजारो शिक्षक टाकत आहेत. राज्यातील अनुदानास पात्र झालेल्या शाळांना सरकार अनुदान देत नाही, अनेक आंदोलने करूनही काही फरक पडत नाही, त्यामुळे शिक्षकांनी मोबाईल वाॅर छेडल्याचं विनाअनुदानित कृती समितीचे प्रशांत रेडीज यांनी सांगितलं.



रिप्लाय दिला पण...

मुंबई विनाअनुदानीत शाळा कृती समिती, स्वाभिमान शिक्षक संघटना आदींनीही शिक्षण मंत्र्याविरोधात 'मेसेज वॉर'ची मोहीम सुरू केल्याची माहिती संघटनेच्या प्रतिनिधिकडून देण्यात आली. मेसेजेसला हैराण होऊन तावडेंनी त्याला रिप्लायही दिला आहे. मात्र त्यात त्यांनी धीर धरण्याशिवाय इतर काही सांगितलं नाही.


काय म्हणाले शिक्षणमंत्री?

काँग्रेस काळात तुम्हाला काहीच मिळालं नव्हतं फक्त गप्पा मारल्या. आमच्या सरकारच्या काळात किमान २० टक्के अनुदान देऊन सुरूवात तर केलीय ना? त्यामुळे अनुदान देऊ पण धीर धरा आणि जे अनुदान देतोय त्यांच्यासोबत रहा असा रिप्लाय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मेसेज करणाऱ्या शिक्षकांना दिला.

शिक्षणमंत्र्यांच्या असा रिप्लाय मिळाल्यावर आता शिक्षकांनी आपलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आता शिक्षण विभागाला जाग येईपर्यंत आमची बाजू आमही सोडणार नाही, असं प्रशांत रेडीज यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा