Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या इमारतीचे कोसळले छत


मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या इमारतीचे कोसळले छत
SHARES

मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या छताचा काहीसा भाग कोसळ्याची माहिती समोर येत आहे. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारासा ही घटना घडली आहे. छताचा भाग कोसळल्यानं विद्यापीठाचा प्रशासनाचा बेभरवशी कारभार समोर आला आहे. इमारतीच्या या अवस्थेबाबत अनेकदा तक्रार करूनही त्या समस्येकडं दुर्लक्ष केलं जात असल्याची माहिती मिळते.

परीक्षा विभागाच्या या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या छताचा काही भाग गुरुवारी सायंकाळी कोसळला. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या कलिना येथील शैक्षणिक संकुलात असलेली परीक्षा विभागाच्या इमारतीमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची सातत्यानं वर्दळ असते. परंतु, सुदैवाने या घटनेमध्ये कुणालाही इजा झाली नाही.

या घटनेमुळं विद्यापीठाच्या बेपर्वा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. परीक्षा विभागाच्या इमारतीबाबत अधिसभेत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचं आश्वासन विद्यापीठ प्रशासनानं दिलं होतं. मात्र, ४ महिने फारशी हालचाल देखील विद्यापीठानं केलेली नाही. परीक्षा विभागाच्या इमारतीच्या दुरवस्थेबाबत विद्यापीठाकडे अधिकार मंडळांचे सदस्य, संघटना यांनी तक्रार केल्या होत्या. परीक्षा विभागासाठी नवी इमारत विद्यापीठानं बांधली आहे. मात्र, तेथे परीक्षा विभागाचे स्थलांतर करण्यात आलेले नाही.

मागील वर्षभरात विद्यापीठाच्या आवारातील, वसतिगृहाच्या इमारतींची पडझड होण्याच्या ३ ते ४ घटना घडल्या आहेत. यामधील २ घटनांमध्ये विद्यार्थ्यांना इजा झाली होती. कलिना येथील रानडे भवनच्या इमारतीचे छत गेल्या वर्षी कोसळले. त्यामध्ये तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या. चर्चगेट येथील जगन्नाथ शंकरशेठ वसतिगृहाच्या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला होता. त्यातही एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला होता.

यामध्ये विद्यार्थ्यांच्या लॅपटॉप आणि इतर साहित्याचंही नुकसान झालं होतं. जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या मुलींच्या स्वच्छतागृहाचीही पडझड झाली. दरम्यान विद्यापीठाच्या खानावळीच्या छताचाही काही भाग पडला होता. या सर्व घटना घडण्यापूर्वी इमारतींच्या दुरवस्थेची तक्रार संघटनांनी प्रशासनाकडे केली होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा