Advertisement

१७ व्या 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा'चा शुभारंभ


१७ व्या 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा'चा शुभारंभ
SHARES

१७ व्या 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा'ला नुकतीच मुंबईतील सिटीलाईट सिनेमा इथं मोठ्या थाटात सुरूवात झाली. या महोत्सवाच्या शुभारंभाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, आशियाई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, आशियाई चित्रपट महोत्सवाचे डायरेक्टर सुधीर नांदगावकर, प्रभातचे सचिव संतोष पाठारे, दिग्दर्शक सुनील सुखथनकर आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी इंडियाचे उपाध्यक्ष प्रेमेंद्र मुझुमदार हे मान्यवर उपस्थित होते.


मुझुमदार यांना पुरस्कार

'वेलकम होम' या मराठी चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. दर वर्षीप्रमाणे थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाद्वारे, सिनेमा आणि सिनेमा निगडित चळवळीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सत्यजित रे मेमोरियल अवॉर्ड दिला जातो. हा मानाचा पुरस्कार यंदा फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी इंडियाचे उपाध्यक्ष प्रेमेंद्र मुझुमदार यांना देण्यात आला.


मदत वाढवण्याची गरज

उदघाटन प्रसंगी बोलताना किरण शांताराम म्हणाले की, भारतात होत असलेला हा एकमेव आशियाई चित्रपट महोत्सव असल्याचा आम्हाला अभिमान आहे. शासनाच्या मदतीमुळे हा महोत्सव सुरू असल्याने आम्ही शासनाचे आभार मानतो, मात्र खंत एवढीच आहे की, पहिल्या वर्षी जेवढी मदत मिळत होती तेवढीच मदत १७ व्या वर्षी सुद्धा मिळत आहे. त्यांनी ही मदत थोडीशी तरी वाढवावी. कारण या मदतीतून आमचा फेस्टिव्हलला जाण्यायेण्याचा खर्चसुद्धा निघत नाही.


'या' चित्रपटांचा समावेश

यंदाच्या आशियाई महोत्सवात अर्जुन दत्ता या बंगाली दिग्दर्शकाचा 'अव्यक्तो' हा चित्रपट व शेखर बापू रानखांबेचा 'पॅम्पलेट' हा ३० मिनिटांचा लघुपट प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटांखेरीज बऱ्याच लघुपट महोत्सवात यशस्वी ठरलेले 'गोची'(दिग्दर्शक प्रियाशंकर घोष ), 'प्रॉन्स' (दिग्दर्शक स्वप्नील शेट्ये ), 'द ड्रेनेज' (दिग्दर्शक विक्रांत रामदास ), 'परसेप्टिव्ह'(दिग्दर्शक आदिनाथ कोठारे), 'बेहरुपीया'(दिग्दर्शक पंकज बांगडे), 'द नॉट' (दिग्दर्शक पंकज बांगडे ) हे चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.


जन्मशताब्दी वर्ष

यंदाचं वर्ष ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे व सुधीर फडके या दिग्गजांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. याचं औचित्य साधून १९५० साली प्रदर्शित झालेला 'पुढचं पाऊल' हा राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपट महोत्सवातील सेंटर पीस म्हणून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची पटकथा, गीते, ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली असून सुधीर फडकेनी संगीत दिलं आहे. पु. ल. देशपांडे व ग. दि. माडगूळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. महोत्सवात इटलीचे स्पेगेटी वेस्टर्न, महिला दिग्दर्शक, स्पेक्ट्रम आशिया, इंडियन व्हिस्टा असे सेक्शन आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा