Advertisement

तुम जियो हजारो साल...


तुम जियो हजारो साल...
SHARES

बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते दिलीप कुमार ९५ वर्षांचे झाले आहेत. दिलीप कुमार आपला वाढदिवस कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यासोबत साजरा करतात. पण यावर्षी प्रकृती ठीक नसल्यामुळे दिलीप कुमार वाढदिवस साजरा करणार नसल्याची माहिती सायरा बानू यांनी दिली. दिलीप कुमार नुकतेच न्यूमोनियातून बरे झाले आहेत. दिलीप कुमार यांना कोणताही संसर्ग होऊ नये, यासाठी डॉक्टरांनी कुणालाही भेटण्याची अनुमती दिलेली नाही.



दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पेशावर (पाकिस्तान) इथे झाला. मोहम्मद युसूफ खान असं दिलीप कुमार यांचं खरं नाव आहे. दिलीप कुमार यांचे वडील हे व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईत आले. १९३० साली दिलीप कुमार यांचे वडील पत्नीसह सात मुलांना घेऊन मुंबईत आले.


दिलीप कुमार यांचा पहिला जॉब रेस्टोरंटमध्ये

एकदा दिलीप कुमार यांचे वडिलांसोबत जोरदार भांडण झाले. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाला (१९३९) सुरुवात झाली होती. रागाच्या भरात दिलीप यांनी घर सोडलं होतं. पण दिलीप कुमार यांच्यावर बहिणीच्या लग्नाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी काहीतरी काम करायचं ठरवलं. काम मिळणार नाही तोपर्यंत घरी जाणार नाही, असं दिलीप यांनी ठरवलं होतं. मुंबई सोडून दिलीप कुमार पुण्याला गेले. एक दिवस भूक लागली म्हणून ते एका इराणी रेस्टॉरंटमध्ये गेले. रेस्टॉरंटमध्ये त्यांनी चहा आणि बिस्किटाची ऑर्डर दिली. दिलीप यांचं उर्दू, पारसी आणि इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व होतं. त्यामुळे त्यांनी हॉटेलच्या मालकाशी पारसी भाषेत संवाद साधला. पारसी भाषेत बोललो म्हणून ते खूप खूष झाले. त्यांना मालकाला असिस्टंटची जागा रिकामी आहे का? असं विचारलं. पण त्यांनी दिलीप यांना अँग्लो-इंडियन मालकाला भेटायला सांगितलं. इंग्रजी भाषा चांगली असल्यानं त्यांनी कॅन्टिन ठेकेदार म्हणून दिलीप यांची निवड केली.



'या ' अटीमुळे मधुबालासोबतचे नाते तुटले

बॉलिवूडची लावण्य सौंदर्यवती मधुबाला आणि दिलीप कुमार हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. 'तराना' चित्रपटाच्या सेटवर या दोघांची प्रेमकहाणीला सुरुवात झाली आणि 'मुगल-ए-आजम' चित्रपटाची शुटिंग पूर्ण होता-होता संपुष्टात आली. बोललं जातं की यासाठी मधुबाला यांचे वडील जबाबदार होते. दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे नाते त्यांना मान्य नव्हते. पण तरीही दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना लग्नाची मागणी घातली. त्यासाठी दिलीप यांनी मधुबालाच्या वडिलांना पत्र देखील लिहिलं. पण मधुबालाच्या वडिलांनी लग्नास नकार दिला. तरीही दिलीप साहेबांनी लग्नासाठी मधुबाला यांच्यापुढे एक अट ठेवली. ती अट म्हणजे लग्नानंतर ते मधुबालाला आणि तिच्या वडिलांना भेटू देणार नाहीत. दोघांपैकी तिला एकाला निवडायचे होते. मधुबालाचे वडिलांवर आणि दिलीप यांच्यावरही प्रचंड प्रेम होते. पण मधुबाला यांनी वडिलांना निवडले. त्यानंतर दिलीप मधुबालापासून दुरावले.



दिलीप-सायरा यांची ५१ वर्षांची साथ

११ ऑक्टोबर १९६६ रोजी दिलीप कुमार यांनी सायरा बानू यांच्याशी लग्न केलं. गेली ५१ वर्ष ते दोघं एकमेकांची साथ निभावत आहेत. सायरा या दिलीप यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान आहेत. पण सायरा बानू यांनी ही दरी प्रेमानं भरून काढली. वयाच्या ८ व्या वर्षापासून सायरा बानो दिलीप कुमार यांच्याशी लग्न करायचं स्वप्न पाहात होत्या. अखेर १९६६ मध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण झालं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा