Advertisement

अटकेचं भय! अखेर कंगना न्यायालयात हजर

जावेद अख्तर यांनी २ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचे वकील निरंजन मुंदर्गी यांच्यामार्फत खासगी तक्रार दाखल केली होती.

अटकेचं भय! अखेर कंगना न्यायालयात हजर
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या विरोधात गीतकार जावेद अख्तर यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीला कंगना मुंबईतील अंधेरी न्यायालयात हजर होती. कंगनापूर्वी जावेद अख्तर हेदेखील साक्ष देण्यासाठी न्यायालयात पोहोचले होते.

न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कंगनाच्या वकिलांनी प्रतिवाद अर्जाचा मुद्दा न्यायालयासमोर ठेवला. त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी १५ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

आजच्या कारवाईपूर्वी कंगनाच्या वकिलांनी तिच्या वतीनं न्यायालयात काऊंटर अ‍ॅप्लीकेशन दाखल केलं आहे. हा अर्ज स्वीकारून न्यायालयानं सुनावणी १५ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. यासोबतच कंगनानं केस ट्रान्सफर याचिकाही दाखल केली आहे.

कंगना रणौत म्हणाली, "न्यायालयानं साक्षीदारांची तपासणी न करता, सुनावणीशिवाय दोनदा वॉरंट जारी केला आहे. या न्यायालयावरून विश्वास उडाला आहे.' अभिनेत्रीनं दाखल केलेल्या अर्जात जावेद अख्तर यांच्याविरोधात खंडणीच्या आयपीसीच्या कलम ३८३, ३८४, ३८७, ५०३, ५०६, आर/डब्ल्यू ४४, ३३अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होती. या सुनावणीला जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आझमी न्यायालयात उपस्थित होते. परंतु कंगना या सुनावणीला पुन्हा एकदा गैरहजर होती.

न्यायालयानं कठोर शब्दात कंगनाला समज देत म्हटलं होतं की, पुढील सुनावणीवेळी जर ती न्यायालयात हजर राहिली नाही तर तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं जाईल. न्यायालयानं दिलेल्या इशाऱ्यानंतर कंगना रणौत २० सप्टेंबर सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाली.

कोरोना चाचणी करता यावी यासाठी १४ सप्टेंबरच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती कंगनाच्या वतीनं न्यायालयाला करण्यात आली होती. परंतु कंगनाच्या मागणीला जावेद अख्तर यांच्यातर्फे विरोध करण्यात आला होता.

तसंच आतापर्यंत कंगना एकाही सुनावणीला हजर झालेली नाही. या उलट आपण प्रत्येक सुनावणीला हजर राहात आहोत. त्यामुळे सतत गैरहजर राहणाऱ्या कंगनाविरोधात अटक वॉरंट बजावण्याची मागणी अख्तर यांच्या वतीनं करण्यात आली होती.

त्यानंतर पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येईल, अशा इशारा न्यायालयानं दिला होता. न्यायालयानं सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये कंगनाविरोधात समन्स बजावले होते. तेव्हापासून ती सतत न्यायालयात सुनावणीला गैरहजर राहत होती.

जावेद अख्तर यांनी २ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचे वकील निरंजन मुंदर्गी यांच्यामार्फत खासगी तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ (मानहानी) आणि कलम ५०० (बदनामीसाठी शिक्षा) अंतर्गत आरोप लावले होते.

जावेद अख्तर यांनी आपल्या याचिकेत स्वत:ची प्रतिष्ठा आणि २०१०-२०१६ पर्यंत राज्यसभेच्या सदस्यत्वाचा उल्लेख केला आहे. कंगानानं आपल्या ५७ मिनिटांच्या मुलाखतीत माझ्यावर अनेक गंभीर आणि निराधार आरोप केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कंगनानं मुलाखतीत त्यांना सुसाइड गँगचा भाग असल्याचं सांगितलं होतं. अख्तर यांनी तिला धमकी दिली होती की तिनं हृतिकवरील खटला मागे घेतला नाही तर तिला आत्महत्या करण्याशिवाय मार्ग राहणार नाही असा आरोपही कंगनानं केला होता.

एका एंटरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली होती की, जावेद अख्तर यांनी तिला घरी बोलावून धमकी दिली होती. कंगनाच्या म्हणण्यानुसार, अख्तर म्हणाले होते की राकेश रोशन आणि त्याचे कुटुंब मोठे लोक आहेत. जर तू (कंगना) माफी मागितली नाही तर ते तुला तुरूंगात टाकतील.हेही वाचा

आयकर विभागाच्या कारवाईनंतर अखेर सोनू सूदनं सोडलं मौन, म्हणाला...

दीपिका पदुकोण आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा