Advertisement

पदार्पणातच अमृतानं स्वप्नीलसोबत जमवली जोडी

अमृता खानविलकरची डेब्यू मालिका असलेल्या ‘जीवलगा’ची कथा दोन प्रेमी जोडप्यांचं गुलाबी जीवन दर्शवणारी आहे. यात अमृताची जोडी स्वप्नील जोशीसोबत जमली असून, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे यांची केमिस्ट्री प्रथमच अनुभवायला मिळणार आहे.

पदार्पणातच अमृतानं स्वप्नीलसोबत जमवली जोडी
SHARES

तरुणाईची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर मागील दोन वर्षांपासून नवनवीन पावलं उचलत आहे. हिंदी सिनेमात डेब्यू केल्यापासून सतत ती महत्त्वाच्या भूमिकांमुळे चर्चेत आहे. याच दरम्यान तिनं वेब सिरीजमध्येही पदार्पण केलं. मोठ्या पडद्यावर बिझी असलेली अमृता आता चक्क छोट्या पडद्यावर पदार्पण करत असून, आपल्या पहिल्या वहिल्या मालिकेत ती स्वप्नील जोशीसोबत दिसणार आहे.


जीवलगा लवकरच प्रसारीत 

दिग्दर्शक-अभिनेता सतीश राजवाडे जेव्हापासून ‘स्टार प्रवाह’चा काँटेंट हेड बनला आहे, तेव्हापासून वाहिनीसोबतच त्यावर प्रसारीत होणाऱ्या मालिकांचाही चेहरामोहरा बदलून गेला आहे. सतीशच्या उपस्थितीमध्ये आज स्टार प्रवाह जणू कात टाकत आहे. नवनवीन बदल घडवत सतीश आगळ्या वेगळ्या संकल्पनांवर आधारित असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. याचाच एक भाग असलेली ‘जीवलगा’ ही नवी मालिका लवकरच प्रसारीत होणार आहे.


जोडप्यांचं गुलाबी जीवन 

या मालिकेचा ट्रेलर एखाद्या सिनेमासारखा भव्य दिव्य स्वरूपात लाँच करण्यात आला. अमृता खानविलकरची डेब्यू मालिका असलेल्या ‘जीवलगा’ची कथा दोन प्रेमी जोडप्यांचं गुलाबी जीवन दर्शवणारी आहे. यात अमृताची जोडी स्वप्नील जोशीसोबत जमली असून, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे यांची केमिस्ट्री प्रथमच अनुभवायला मिळणार आहे.


उलट प्रवास 

जीवलगा’च्या माध्यमातून टीव्हीवर पदार्पण करण्याबाबत अमृता म्हणाली की, बरेच कलाकार टीव्हीवरून सिनेमांकडे जातात, पण माझा प्रवास उलट झाला आहे. एका महत्त्वपूर्ण मालिकेत स्वप्नील, सिद्धार्थ आणि मधुरासारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणार असल्याचा आनंद आहे. सतीशने एक फोन केला आणि मी ही मालिका स्वीकारली. इतका सतीशवर माझा विश्वास आहे. आता ‘जीवलगा’चा ट्रेलर पाहिल्यावर योग्य पाऊल उचलल्याचं समाधान लाभलं.


खूपच उत्साही

स्वप्नील आपल्या पुनरागमनाबद्दल बोलताना म्हणाला की, मी ‘जिवलगा’मधील माझ्या भूमिकेबाबत खूपच उत्साही आहे. आज मी जो काही आहे तो टीव्हीमुळेच आहे. खूप वर्षांनंतर मी मालिका करतो आहे. मी आणि स्टार प्रवाहची संपूर्ण टीम ही मालिका आपल्यासमोर आणण्यासाठी उत्साही आहोत. यात विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारत आहे. मागून काहीही मिळत नाही ते कमवायला लागतं यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे.

 

८ एप्रिलपासून प्रसारीत

या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचं लेखन केलं आहे. ही मालिका उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शित केली आहे. ‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे विविध पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे. ‘जिवलगा’ ८ एप्रिलपासून प्रसारीत होणार आहे.



हेही वाचा -

‘जागते रहो’ म्हणत मराठी सिनेसृष्टी पेटवणार देशभक्तीची ज्योत

'वेडिंगचा शिनेमा'नं दिले ऑनलाइन गायक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा