आजचा जमाना आहे वेब सिरीजचा…. त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीतील बरेच आघाडीचे कलाकार चित्रपटांच्या जोडीला टीव्ही मालिकांपेक्षा वेब सिरीजमध्ये काम करण्याला प्राधान्य देत आहेत. आता या यादीत अर्शद वारसीचंही नाव सामील होणार आहे.
चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून अर्शदने आज आपला चांगला जम बसवला आहे. त्याने साकारलेल्या सर्किटसारख्या काही व्यक्तिरेखा कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. अशातच त्याची पावलं वेब सिरीजच्या दिशेने वळली आहेत. सुरुवातीला सहाय्यक अभिनेता बनून आलेल्या अर्शदने काही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकाही साकारल्या आहेत. आता ‘असूरा’ या आगामी वेब सिरीजमध्ये तो एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. वूट ओरिजनल्सची ‘असूरा’ ही अर्शदची पहिलीच वेब सिरीज आहे. यात तो डॉ. धनंजय ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.
सायकॉलॉजिकल थ्रिलर असा जानर असलेल्या या वेब सिरीजमध्ये त्याने चलाख तसंच काहीशा विचित्र माणसाची व्यक्तिरेखा साकारली आहे. वेब सिरीजकडे वळण्याबाबत अर्शद म्हणाला की, आजघडीला भारतामध्ये ओटीटीचं भवितव्य उज्ज्वल आहे.
डिजिटल विश्वामध्ये आशयघन आणि नावीन्यपूर्ण पटकथांच्या जोडीला नव्या वैविध्यपूर्ण कथांना खूप वाव आहे. या विश्वाचा एक भाग होण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट असल्याचं मी मानतो. इथे प्रयोगशीलतेलाही वाव असल्याने अभिनयाच्या कक्षा आणखी रुंदावण्यासाठी मदत मिळते. ‘असूरा’मध्ये मी साकारत असलेली डॉ. धनंजय ही व्यक्तिरेखा एका हुषार आणि समंजस माणसाची आहे. कोणतीही गोष्ट परफेक्टच असायला हवी असा त्याचा अट्टाहास असतो. या व्यक्तिरेखेतील गुणदोष नेटकेपणाने कॅमेऱ्यासमोर सादर करण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचंही अर्शदचं म्हणणं आहे.