पुढच्या वर्षी भरत जाधव नव्या क्षेत्रात

  Dadar (w)
  पुढच्या वर्षी भरत जाधव नव्या क्षेत्रात
  मुंबई  -  

  महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर नाटक आणि चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवत असलेला अभिनेता भरत जाधव आपल्याला पुढच्या वर्षी नव्या क्षेत्रात पदार्पण करताना दिसणार आहे. आता हे नवीन क्षेत्र कुठले? नाटक, सिनेमांशी त्याचं काही कनेक्शन असेल का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. अखंड ऊर्जेने रंगमंचावर वावरणाऱ्या भरतने नव्या पदार्पणासाठी क्रीडा क्षेत्राची निवड केली आहे. भरत जाधवला अभिनयाशिवाय अजून काय आवडते हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असतील. तर याचे उत्तर आहे बुद्धिबळ. होय, भरतला बुद्धिबळ हा खेळ खूप आवडत असल्याची कबुली खुद्द त्यानेच दिली आहे.

  रविवार 21 मे रोजी दादर शिवाजी पार्क जिमखाना येथे झालेल्या 'सतीश सबनीस स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धे'च्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी भरत जाधवने पुढच्या वर्षी या बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या खेळात उंटाची चाल अर्थात तिरकी चाल खेळायला खूप आवडते. बुद्धिबळ हा बुद्धिचा खेळ आहे. मन शांत ठेऊन खेळल्यास हा खेळ उत्तमरित्या खेळता येतो, असे मत भरतने यावेळी व्यक्त केले.

  लहान मुलांना खेळताना पाहून मला देखील स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा झाली आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत सुमारे दीडशे खेळाडू सहभागी झाले होते. तर यंदा स्पर्धेत 300 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. हेच या स्पर्धेचे खूप मोठे यश आहे. स्पर्धेत 6 वर्षांखालील वयोगटातील मुलांना खेळताना पाहून मी अगदी भारावून गेलो आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचा प्रमुख अतिथी म्हणून अभिमान वाटत असल्याचे भरत यावेळी म्हणाला.

  आपल्या अभिनयातून रसिकांची मने जिंकणारा भरत बुद्धिबळाच्या पटलावर आपली चाल कशी खेळणार, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.