Advertisement

मजुरांचा मसिहा.. सोनू


मजुरांचा मसिहा.. सोनू
SHARES
Advertisement

गेले चार पाच महिने जगाला हादरवणारे आहेत. कोरोना नावाच्या विषाणूने जगभर धुमाकूळ घातलाय. भारतातील चित्रही भीषण आहे. लॉकडाऊनचे चार भाग आपण अनुभवत आहोत. लोक घरात बंदिस्त आहेत. टीव्हीवर अंगावर काटा आणणाऱ्या बातम्यांचा भडीमार सुरु आहे. सत्ताधारी विरोधकांत जुंपली आहे. सोशल मीडियावर अफवांचं पीक सुरु आहे. या सगळ्यामुळे आधीच धास्तावलेली जनता भेदरून गेली आहे. कित्येकांनी आता बातम्या पाहणं बंद केलंय. अचानक झालेल्या या लॉकडाऊनमुळे देशातल्या मजुरांच्या प्रश्नाचा स्फोट झाला. हजारो लाखो मजूर रस्त्यावर आले. त्यांचं खाणं संपलं होतं. पैसे संपले होते. सगळे मार्ग बंद झाले होते. बाहेरच्या कोरोनाला न घाबरता ते रस्त्यावर आले. घरात मरण्यापेक्षा आपल्या गावातील घरात जाऊन  मरू असं त्यांना वाटलं. म्हणून हजारो किलोमीटर स्थालांतरित मजूर पायी चालत आपापल्या घराकडे निघाले. उन्हातान्हातून कासावीस होत आपल्या पोराबाळांसोबत ते रस्त्यावरून जाताना टीव्हीवर दिसत होते. सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडीओ पाहून आम्ही सगळे घरात बसलेले हादरून गेलो. काय करणार ? लॉकडाऊनमुळे आपण सगळे घरात आहोत. घराबाहेर पडणार तरी कसे? असा फालतू प्रश्न तुम्हा आम्हाला पडतोय. आम्ही कशी मदत करणार? असा कातडीबचाव आपण करीत आहोत. पण.... पण इथे मात्र एक बहादूर घराबाहेर पडलाय. स्थालांतरित मजुरांसाठी रस्त्यावर उतरलाय. या हिरोचं नाव आहे सोनू सूद ...! 

बॉलिवूडचा व्हिलन सोनू सूद सध्या तुफान चर्चेत आहे. साऊथच्या बऱ्याच फिल्ममध्ये सोनूने निगेटिव्ह रोल केलेत. आज मात्र सोनू रस्त्यावर एखाद्या हिरोसारखं काम करतोय. या हिरोने हजारो मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवलंय. आणि आताही पाठवतोय. यासाठी लागणारी किचकट सरकारी प्रक्रिया तो पार पडतोय. आज त्याला दिवसाला ५० हजारावर मेसेजेस येताहेत. १८ तास तो काम करतोय राबतोय. कुणीतरी त्याला विचारलं, तू किती वाजल्यापासून कामाला सुरुवात करतोस? तेव्हा सोनू म्हणाला , आम्ही झोपतोच कुठे? मी बऱ्याचदा पहाटे चार पर्यंत जागा असतो. तर कधी सकाळी सहापर्यंत मेसेजना उत्तर देत असतो. कामाची आखणी चालू असते. सरकारकडून परवानग्या घेताना खूप अडथळे येतात असं तो म्हणतो. शिवाय मजुरांची कागदपत्रं तपासावी लागतात. हे पेपर चुकीचे असले तर त्या मजुराला दुसऱ्या राज्याच्या बॉर्डरवर अडवलं जाईल. ही काळजी त्याला असते. सोनूच्या या सगळ्या बसेस प्रत्येक मजुराच्या घराच्या दारापर्यंत सोडतात. हा सगळं आटापिटा करताना सोनूच्या टीमने आजवर १० हजारावर मजुरांच्या मेडिकल टेस्ट केल्या आहेत. गेला बुधवार सोनूसाठी खास होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी त्याचं फोन करून खास कौतुक केलं. ते सोनूला म्हणाले ' आपल्याला भेटायला पाहिजे, परवा कॉफी प्यायला या. !

सोनू सध्या सोशल मीडियावर कोरोनापेक्षा जास्त फेमस झालाय.  गुगल सर्चमध्ये त्याने टॉपवर असणाऱ्या अक्षय कुमारालाही मागे टाकलंय. सोनूला रोज विविध प्रकारचे मेसेज येत असतात. एकांन त्याला विचारलं, सोनू मला दारूच्या दुकानापर्यंत नेऊन सोड ना.  असतात असे थट्टा टिंगल करणारे महाभाग. पण सोनू वैतागत नाही. तो मिश्कीलपणे उत्तर देतो. ' भावा मी तुला दारूच्या दुकानापासून घरी सोडू शकतो. गरज लागली तर सांग. सोनूचं हे ट्विट खूप व्हायरल झालं होत. सोनूच्या कामावर टीका करणारे काही चक्रम लोक आहेतच. काहीजण त्याला म्हणतात तू पब्लिसिटी  स्टंट करतोयस. सोनू मात्र त्यांना सडेतोड उत्तर देतो. अनेकांची बोलती बंद करतो. बरेचसे चमकेश लोक त्याला म्हणतात, सोनू तुम्ही मदत करायला बाहेर जाल , तेव्हा आम्हाला कळवा, आम्ही तुमच्या सोबत येऊ. पण सोनू अशा चमकेश भाऊंना लांब ठेवतो. फोटो प्रसिद्धीची हौस असणारे बरेच आपल्या अवतीभवती असतात. काढ फोटो टाक फेसबुकवर, टाक इंस्टावर. सोनू आणि त्याची टीम या आपल्या कामात मग्न असते. कुणीतरी त्याला गेल्या आठवड्यात म्हटलं, सोनू हे सगळं आटोपल्यावर रविवारी तुला सुट्टी घ्यावी लागेल. अमिताभ सलमानच्या घरासमोर सुट्टीच्या दिवशी जशी गर्दी होते तशी गर्दी तुझ्या घरासमोर होईल. पण सोनू या चाहत्याच्या बोलण्याने हुरळून जात नाही. उलट तोच त्या चाहत्याला म्हणतो, मित्रा ते काय माझ्या घरी येतील... मीच त्या सगळ्यांच्या घरी जाणार आहे. माझ्या या भावांवर पराठे चहाची उधारी बाकी आहे. ..!

काही म्हणा पण कोरोनाच्या या भीतीदायक वातावरणात सोनूने लोकांमध्ये थोडी जान आणलीय. जणू आशेची पालवी फुटलीय. धास्तावलेली चुरगळलेली मन जरा सावरली आहेत. आता हे एक बघा, सोनूच्या चाहत्याने एक ट्विट केलंय, तो म्हणतोय, माझं नाव सुद्धा सोनू आहे, सोनू नाव असलेले लोक खूप बिघडलेले असतात, असं माझी मावशी म्हणायची. पण आता माझी आई म्हणते , बघ त्या सोनूने काय करून दाखवलं. भावा तुला सलाम. एका सोनूकडून दुसऱ्या सोनूला.' या ट्विटला उत्तर देताना सोनू म्हणजे आपला सोनू म्हणतो, भाई, मलाही लोक म्हणायचे, सोनू हे अभिनेत्याचं नाव कस असू शकत? अनेकदा मी नाव बदलण्याचा विचार केला होता. पण नंतर म्हटलं जाऊदे. जर सोनू या नावाने इथवर आलोय तर याच नावाने पुढेही जाईन..! बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणतो, सिनेमात येण्याआधी खर तर मला इंजिनिअर व्हायचं होत, इंजिनिअर झालो तेव्हा वाटलं खूप मोठी गोष्ट कमावाली. त्यानंतर अभिनय क्षेत्रात आल्यावर वाटलं खूप मोठा झालो. पण आता जे काम करतोय त्याचं मात्र समाधान याहीपेक्षा खूप मोठं आहे. कदाचित या गरीब लोकांच्या मदतीसाठीच मी मुंबईत आलोय असं वाटतेय. लाखोंच्या चेहऱ्यावर मी समाधान आणू शकतो यापेक्षा आयुष्यात सर्वाधिक आनंदी काय असू शकतं? या पेक्षा अजून मोठं काय हवंय?

या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली? हे मजूर जेव्हा रस्त्यावरून जात होते तेव्हा या भुकेलेल्या लोकांना सोनू अन्न वाटप करत होता. तेव्हा एका महिलेला त्याने सहज विचारलं कुठे चालला आहात? तेव्हा ती म्हणाली बिहारला. त्याने विचारलं कसं जाणार? गरीब महिलेनं उत्तर दिलं चालत जाणार..! हे उत्तर ऐकून सोनू हादरला. पायी चालत ...? ते सुद्धा बिहारला..? तेव्हा त्यानं ठरवलं यांची जाण्याची काहीतरी व्यव्यस्था करायला हवी. आणि मग तो आणि त्याची टीम लागली कामाला. सोनू आता स्थलांतरित मजुरांचा देव झालाय. एका मुलाखतीत त्याने मजेशीर गोष्ट सांगितली. १२ मे रोजी काही लोकांना त्याने दरभंगा येथे पाठवलं होत. या प्रवासात एक महिला गरोदर होती. घरी पोहचल्यावर या महिलेनं एका मुलाला जन्म दिला. या कुटुंबाने नंतर सोनूला फोन करून सांगितलं, की आम्ही मुलाचं नाव सोनू सूद श्रीवास्तव असं ठेवलंय. बघा हे असं आहे वास्तव. सोनू म्हणाला हे सगळं भावुक करणारं आहे. कुणी त्याचा उत्तर प्रदेशात पुतळा बनवायचा म्हणतोय. पण सोनू त्याला म्हणतोय आधी कुटुंबाची काळजी घे. असा हा सोनू . तुम्ही आम्ही सगळे घरात बसलेले असताना सोनू मात्र रस्त्यावर मजुरांच्या गाड्यांना आदेश देतोय. आत बसलेल्या स्थलांतरित मजुरांना गुड बाय करतोय. असो, हा लेख लिहिताना टीव्हीवर बातम्या चालू होत्या. त्यातली एक बातमी सांगून आटोपत घेतो. तर बातमी अशी आहे, सलमान खान म्हणे आता नव्या शो सह टीव्हीवर येणार आहे. हा शो म्हणजे तो लॉकडाऊन दरम्यान तो घरात राहत होता त्याबद्दल असणार आहे. हिरो सलमान घरात आहे आणि व्हिलन सोनू बाहेर रस्त्यावर लोकांसाठी जीवाचा आटापिटा करतोय...! बाय द वे एक सांगायचं राहून गेलं. सोनूचा एक चाहता म्हणतोय, हमारे सोनू को हिरोका रोल नाही दिया तो भगवान की कसम थियेटर को आग लागा दूंगा. हे प्रेम जरा जास्त वाटतं का? घरात बसलेल्यानो तुम्हाला काय वाटतंय?

संबंधित विषय
Advertisement