'त्या' आठवणीही नकोशा वाटतात...

Mumbai
'त्या' आठवणीही नकोशा वाटतात...
'त्या' आठवणीही नकोशा वाटतात...
'त्या' आठवणीही नकोशा वाटतात...
'त्या' आठवणीही नकोशा वाटतात...
'त्या' आठवणीही नकोशा वाटतात...
See all
मुंबई  -  

२६ जुलै २००५ हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकणार नाही. आजही २६ जुलै चा पाऊस म्हटलं की पाण्यावर तरंगणारी मुंबई आठवते. पाण्यात वाहत जाणाऱ्या गाड्या, प्राणी सगळं डोळ्यापुढे जसंच्या तसं उभं राहतं. आज त्या महाप्रलयाला १२ वर्ष पूर्ण झालीत. पण तरीही त्याच्या भयानक आठवणी अजून तशाच आहेत. या दिवसाच्या निमित्ताने आम्ही काही कलाकारांशी बातचीत केली आणि त्यांच्याकडून जाणून घेतल्या  '२६ जुलै २००५' च्या आठवणी.सागर कारंडे , अभिनेता

मला अजूनही तो दिवस अगदी ठळक आठवतो. माझ्या स्ट्रगलिंगचा काळ होता. त्यामुळे रोज शक्य होईल तिथे, खास करून दादरच्या शिवाजी मंदिरला जायचं आणि कोणी काम देणारं सापडतंय का हे पहायचंं, हा माझा दिनक्रम असायचा. त्यादिवशीसुद्धा मी शिवाजी मंदिर परिसरात गेलो होतो. माझ्याबरोबर माझे काही मित्रही होते. पाऊस आदल्या दिवसापासूनच कोसळत होता. मी आणि माझे मित्र संध्याकाळी तिथून घरी जायला निघालो. मला समुद्रकिनारी बसायला फार आवडतं आणि त्यात पाऊस असेल तर जास्तच भारी वाटतं. त्यादिवशी पण मी चौपाटीवर बसायला गेलो होतो. माझे सर्व मित्र दादर स्टेशनला पोहचले आणि त्यांनी मला कॉल करून सांगितलं की सर्व ट्रेन बंद आहेत. एव्हाना मी  बसलो होतो तिथे म्हणजे चौपाटीच्या ठिकाणाहून प पोलिसांनी लोकांना अक्षरशः हाकलवायला सुरुवात केली होती. तेव्हा मला थोडासा अंदाज आला की, पावसाचा जोर वाढलाय. मी घरी जायला निघालो तेव्हा रस्त्यावर पाणी साचलं होत आणि सेनाभवनपर्यंत येऊन पोहोचलो, तेव्हा रस्त्यावर ट्रॅफिक होतं. गाड्यांची ही भली मोठी रांग. 'बेस्ट'बसेस प्रवाश्यांनी तुडुंब भरल्या होत्या. पाणी खूप वाढलं होतं. मी तेव्हा माहीमला राहायचो. त्यामुळे मला घरी लवकर पोहचणं शक्य होतं.पण मी जेव्हा त्या अडकलेल्या लोकांना पाहिलं, काही लहान मुलं पाहिली, तेव्हा त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आलं. माझ्या खिशात अवघे 100 रुपये होते. सेनाभवन जवळ मला एक वडापाववाला दिसला. मी त्याच्याकडून 100 रपयांचे वडापाव घेतले. ते पाहून माझ्या बाजूच्या एका माणसानेही बरेच वडापाव घेतले आणि आम्ही ते       बसमधल्या लोकांमध्ये वाटले. मुंबईत रोज भांडणं होतात. लोक एकमेकांना मारायला उठतात. पण जेव्हा अशी वेळ येते तेव्हा सर्व एकत्र होऊन एकमेकांच्या मदतीला धावून आलेले मी पाहिलं आहे. मी अजूनही तो दिवस विसरू शकत नाही. पुन्हा असा दिवस येऊ नये.

गायत्री सोहम ,अभिनेत्री

माझी मुंबईतली पहिली ऑडिशन मी २५ जुलै२००५ साली दिली. तो दिवस आठवला तरी अजूनही अंगावर काटा येतो. मुंबईत माझी ऑडिशन झाली. संध्याकाळी ६.३० वाजता च्या 'पंचवटी एक्सप्रेस'ने नाशिक ला परत जायचं हे माझं आधीच ठरलं होतं. पण दादरला पोहोचेपर्यंत  उशीर झाला आणि पंचवटी हुकली, तेव्हा घरी आईला कळवलं आणि रात्री एका मैत्रिणीकडे राहिले. आता राहिलेच होते मुंबईत तर विचार केला की, उद्याचीही म्हणजे २६ जुलै ची सुद्धा १ ऑडिशन देऊन मग पंचवटीनेच घरी जाता येईल. २६ जुलै ची सकाळ उजाडली. दुपारी 3 च्या आसपास मुंबई भर पाणी तुंबत होतं. मी अंधेरीच्या एका स्टुडियो मधुन ऑडिशन देवून बाहेर पडले आणि काही कळायच्या आत 3 फुट पाण्यातुन चालायला लागले. सुरुवातीला हे सगळं मला भीषण वाटत नव्हतं. पण नंतर आजुबाजुला चालणारी माणसं वाढली. त्यांच्यातल्या चर्चा ऐकल्या. जीवावर बेतू शकेल अशी चर्चा ऐकल्यावर मात्र मला धडकी भरली. डोळ्यातून आपोआप पाणी येत होते. खाटकन कुंडली आठवली, मृत्यूचं कारण- पाणी. थरकाप उडाला माझा. पावले झपाझप टाकत तिथल्याच एका जवळच्या घरात आसरा मिळवला. तोपर्यंत अफवा पसरू नये  म्हणून सगळ्यांच फोन चे नेटवर्क जॅम करून ठेवले होते. त्यामुळे घरी हे सर्व कळवण्यासाठी कोणताच मार्ग न्हवता. दुसऱ्या दिवशी पाऊस आणि पाणी हळूहळू कमी होत गेलं, तेव्हा जीवात जीव आला. २ दिवसानानंतर मी घरी नाशिकला पोहोचले. घरी आईने गणपती पाण्यात ठेवला होता. आम्ही एकमेकीला पाहिलं आणि जवजवळ तासभर आम्ही फक्त मिठी मारून रडत होतो.


हेमांगी कवी, अभिनेत्री

२६ जुलै हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. मी कळव्याला रहायचे. त्या दिवशी मी एकटीच घरी होते. भाऊ ऑफिसमध्ये अडकला होता. बहीण दादरला अडकली होती. माझं संपूर्ण घर गळत होतं. सुरुवातीला मला या सगळ्या गोष्टींची गंमत वाटत होती. पण जसजसा पाऊस वाढू लागला तसतसं  मला त्या गोष्टीचं गांभीर्य समजलं. माझ्या घरात माझी अशी एक फेव्हरेट जागा आहे जिथे बसून मी वाचन करायचे, चित्र काढायचे. ती एकच जागा अशी होती जिथे पाणी गळत नव्हतं. त्या जागेवर मी घरातली सगळी अंथरूणं ,गाद्या एकावर एक टाकल्या आणि तिथे बसून मी ते ३ दिवस काढले. बिल्डिंगखाली एवढं पाणी साठलं होतं की, माझ्या भावाचे मित्र अक्षरशः बोट घेऊन आले होते आणि मला खालून दोरीने बिस्कीट चे पुडे द्यायचे. ती बिस्किटं, घरात उरलेलं दूध, शेंगदाणे असं खाऊन मी ते दिवस काढले. आजही तो दिवस जसाच्या तशा डोळ्यासमोर उभा राहतो.संतोष जुवेकर, अभिनेता

मी त्या दिवशी शूट करत होतो. विलेपार्लेच्या 'वैकुंठ व्हिला' मध्ये आमच्या 'ह्या गोजिरवाण्या घरात' ह्या मालिकेचं शूट सुरु होतं. त्यादिवशी सकाळपासूनच पाऊस होता. थोड्या वेळाने पावसाचं पाणी रस्त्यावर साठू लागलं. नंतर हळूहळू आम्ही ज्या बंगल्यात शूट करत होतो, त्याच्या आत पाणी यायला लागलं. म्हणून आम्ही बाहेर जाऊन बघितलं तेव्हा रस्त्यावर गुढग्यापर्यंत पाणी तुंबलं होतं. थोड्या वेळाने बंगल्यातल्या लाईट गेल्या म्हणून आम्ही शूटींग थांबवलं. २-३ तास वाट पाहूनही लाईट आल्या नाहीत, मग आम्ही सगळ्यांनीच पॅकअप करून घरी जायचं ठरवलं आणि बाहेर आल्यावर दिसलं की सगळीकडे पाणी खूप वाढलंय. रस्त्यावरच्या गाड्या अर्ध्या पाण्यात बुडाल्या होत्या. शेवटी मी माझी बाईक तिथेच ठेवली. काहीजण बंगल्यातच राहिले आणि आम्ही काहीजण निघालो. मी, प्रदीप वेलणकर आणि अजून काही जण होतो. आमची डायरेक्टर दीपाची उंची कमी असल्याने आम्ही तिला उचलून घेतलं होत. जुहूपर्यंत माझ्या छातीपर्यंत पाणी तुंबलं होतं. तिथून आम्ही आधी प्रदीप वेलणकरांच्या घरी पोहोचलो. काहीजण त्यांच्या घरी राहिली आणि त्यानंतर विलेपार्ले ते रहेजा पर्यंत मी चालत घरी आलो. जवळजवळ ७-८ तासांनी मी घरी पोहोचलो. त्या पाण्यात कितीतरी प्राणी वाहत जाताना मी पहिले आहेत. तो दिवस आठवणींतून कधीच पुसला जाऊ शकत नाही. आम्ही जे कोणी वाचलो ते केवळ नशिबानचे. आजही ३ तासापेक्षा जास्त पाऊस पडला की टेन्शन यायला लागतं.


गौरव घाटणेकर , अभिनेता

त्या वेळेस मी कॉलेजला होतो. सायनच्या एस.आय.इ.एस. कॉलेज मधून मी मास कम्युनिकेशन करत होतो. त्या दिवशी आमचं प्रोजेक्ट सबमिशन होतं. त्यामुळे आम्ही सर्वच जण कॉलेजला जमलो होतो. पाऊस होता त्यामुळे कॉलेज नंतर आम्ही सर्व मित्र तिथल्या विन्स्टन कॅफेमध्ये गेलो. नंतर हळू हळू खूप पाऊस वाढू लागला आणि थोड्या वेळातच त्या कॅफेबाहेर गुढग्याच्या वरपर्यंत पाणी साचलं होतं. पाणी कॅफेत येऊ नये, म्हणून त्या कॅफेचे दरवाजे बंद करून शटर पण बंद केलं गेलं. मोबाईलचं नेटवर्क जॅम होतं. त्यामुळे घरी कळवता ही येत नव्हतं. माझे बाबा मर्चंट नेव्ही मध्ये होते त्यामुळं ते कुलाब्याला असायचे. माझ्यासारखे तेही अडकले असणार हे मला माहीत होतं. पाणी एवढं वाढलं की आम्ही सगळेच वाहून जाऊ की काय, याची भीती वाटत होती. त्यावेळी कॅफेच्या मालकाने खूप मदत केली. आम्ही जेवढे लोक त्या कॅफेत होतो. त्यांच्या खाण्यापिण्याची तो सर्व काळजी घेत होता. २ दिवस आम्ही त्या कॅफेत राहिलो होतो. २ दिवसानंतर जेव्हा घरी गेलो त्या दिवशी माझ्या जीवात जीव आला.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.