Advertisement

'नवरी नटली' फेम गायक छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन

'खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली काल बाई सुपारी फुटली' या गाण्यानं छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली.

'नवरी नटली' फेम गायक छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन
SHARES
Advertisement

प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं गुरुवारी निधन झालं. कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच छगन चौगुले यांनी अखेरचा श्वास घेतला.

'खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली काल बाई सुपारी फुटली' या गाण्यानं छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली. याच बरोबर छगन चौगुले यांनी 'कथा चांगुणाची', 'कथा श्रावण बाळाची', 'आईचं काळीज', 'अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी', 'कथा देवतारी बाळूमामा' यासारखे अनेक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या सीडीज तर विशेष गाजल्या तर छगन चौगुले यांनी अनेकांच्या कुलदेवतांची गाणी आणि लोकगिते गायली आहेत.

छगन चौगुले हे हाडाचे लोककलावंत होते. त्यांनी लोककलेचे विशेष असे कोणतेही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. तरीही त्यांची कला सादर करण्याची कौशल्य अफलातून होती. मुळातले ते जागरण गोंधळी होते. त्यामुळे त्यांची सुरुवात ही जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून झाली. परंतु, केवळ जागरण गोंधळाचे कार्यक्रम न करता त्यांनी स्वत:तील कलेला व्याप्त स्वरुप दिले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचे निधन झालं. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रत्नाकर मतकरी यांच्यावर सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अखेर रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी अशी त्यांची ओळख आहे.

गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी अॅडमिट झाले असताना त्यांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथेच त्यांचं निधन झालं. मृत्यूसमयी ते 81 वर्षांचे होते.हेही वाचा


संबंधित विषय
Advertisement