Advertisement

2016 चे हिट आणि फ्लॉप सिनेमे


SHARES

मुंबई - 2016 ला निरोप आणि 2017 चं स्वागत करायला आपण सगळेच सज्ज आहोत. या वर्षाला गुडबाय करताना या वर्षानं आपल्याला कोणकोणते नवे मराठी सिनेमे दिले, त्यातले कोणते ठरले हिट आणि कोणते ठरले फ्लॉप यावर आपण एक नजर टाकणार आहोत.

2016 मध्ये एकूण 69 मराठी चित्रपट झळकले. यातल्या काही सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं, तर काहींची नावही अजून प्रेक्षकांना धड माहिती नाहीत. नटसम्राट, सैराट, व्हेंटिलेटर, फ्रेंड्स, गुरु, बंध नायलॉनचे, पोस्टर गर्ल, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, फुंतरू, कापूसकोंड्याची गोष्ट, रंगापतंगा, हाफ तिकीट, लॉस्ट अँड फाउंड, चौर्य, भो भो, फोटोकॉपी, वजनदार या सिनेमांची नावं प्रेक्षक नक्कीच विसरणार नाहीत.

नजर टाकूयात अशा काही खास सिनेमांकडे, ज्यांची जास्त चर्चा झाली. 2016 मध्ये 3 खास सिनेमांच्या यादीत आहेत सैराट, नटसम्राट आणि व्हेंटिलेटर हे सिनेमे.
या वर्षी मराठी सिनेमानं आतापर्यंतचा कमाईचा उचांक गाठला, अर्थातच ' सैराट' च्या रुपानं. झिंगाट संगीत, उत्तम कथा आणि नव्या, फ्रेश जोडीचा उत्तम अभिनय या सगळ्यामुळे नागराज मंजुळेच्या सैराटला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

नटसम्राट- दर्जेदार, अजरामर नटसम्राट नाटक चित्रपटाच्या स्वरुपात सिनेमागृहात दाखल झालं आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षकांची एकच गर्दी झाली. मराठी माणसानं या नाटकाला भरभरून प्रेम दिलं होतं, तसंच सिनेमालाही मिळालं. नाना पाटेकर यांच्या अभिनयातून त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या हे नक्की.

व्हेंटिलेटर लक्षात राहणार तो हिन्दी सिनेसृष्टीतील पिगी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा निर्मित पहिला मराठी सिनेमा ज्यात आशुतोष गोवारीकरही बऱ्याच वर्षानंतर दिसले. भावनिक नाती, प्रत्येक माणसाशी कनेक्ट होणारी स्टोरी असा हा सिनेमाही सगळ्यांना आवडला. प्रियंकाच्या आवाजातल्या 'बाबा' या गाण्यानंही प्रेक्षकांच्या काळजालाच हात घातला.

या ३ सिनेमांशिवाय हाफ तिकीट, दोन लहान जीवांची आयुष्य जगतानाची धडपड, त्यातही कायम राहिलेली निरागसता आणि प्रतिकूल परिस्थितीतही नवीन उमेद जिवंत करणारं भाष्य... या आगळ्या वेगळ्या प्रयत्नानं, त्यात काम करणाऱ्या दोन्ही चिमुरडयांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

पोस्टर गर्लमध्ये एक अतिशय नाजूक विषय सिनेमात विनोदी पद्धतीने मांडण्यात आला होता. आजही स्त्री भ्रूणहत्या होते, मुलगा-मुलगी हा भेद होतो. पण त्यामुळे कोणत्या परिस्थितीला सामोरं जायची वेळ येऊ शकेल, हे विनोदी पद्धतीनं या सिनेमात दाखवण्यात आलं.

गोष्ट कापूस कोंड्याची हा चित्रपट एक वेगळी कथा घेऊन आला. वडिलांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता ४ मुली आयुष्याचा सामना कसा करतात, ते या सिनेमात पाहायला मिळालं.रंगा पतंगा या सिनेमात मनोरंजन करतानाच, तिरकस भाष्य करण्याचा दिग्दर्शकानं चांगला प्रयत्न केला. दुष्काळी भागातल्या एका गरीब शेतकऱ्याची हरवलेली बैलजोडी आणि ती शोधण्यासाठीची त्याची धडपड शहरी भागातल्या प्रेक्षकांनाही भावली.

पण,  चांगली स्टारकास्ट असूनही गुरु, फ्रेंड्स, वन वे तिकीट, मिस्टर ऍण्ड मिसेस सदाचारी, लॉस्ट अँड फाउंड, जाऊ द्या ना बाळासाहेब या सिनेमांची जादू मात्र काही केल्या चालली नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा