Advertisement

अभिनेत्री सायरा बानो यांनी मागितली पंतप्रधानांकडे मदत

बिल्डर समीर भोजवानीची पोलिस कोठडीतून सुटका झाल्याने बानो पुन्हा धास्तावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे.

अभिनेत्री सायरा बानो यांनी मागितली पंतप्रधानांकडे मदत
SHARES

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि आपल्या काळातील सदाबहार अभिनेत्री सायरा बानो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. प्राॅपर्टीच्या वादातून बिल्डरच्या त्रासाला कंटाळून सायरा बानो यांनी पंतप्रधानांना भेटीची गळ घातली आहे.


काय आहे प्रकरण?

मुंबईच्या वांद्रे परिसरातील पाली हिल इथं दिलीप कुमार यांचा जुना बंगला आहे. ज्या जमिनीवर हा बंगला उभा आहे, ती जमीन दिलीप कुमार यांनी १९५३ मध्ये १.४० लाख रुपयांना खरेदी केली होती. मात्र बिल्डर समीर भोजवानी याने असा दावा केला की, त्याच्या वडिलांनी १९८० मध्ये ही जमीन मूलराज खताऊ ट्रस्टकडून खरेदी केली आहे. या व्यवहाराची कागदपत्रे सादर करून त्याने हा जमिनीचा ताबाही दिलीप कुमार यांच्याकडे मागितला होता.


पोलिस कोठडीतून सुटका

परंतु, भोजवानीने संबंधित भूखंडाची खोटी कागदपत्र तयार केल्याचा पोलिसांना संशय होता. त्यातून जेव्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भोजवानी याच्या घरी छापा मारला तेव्हा त्यांच्या घरातून काही कागदपत्रे आणि शस्त्र पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी त्याला एप्रिलमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. तर, त्याआधी बानो यांच्या तक्रारीवरून जानेवारीत भोजवानीविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. मात्र आता भोजवानीची पोलिस कोठडीतून सुटका झाल्याने बानो पुन्हा धास्तावल्या आहेत.


काय आहे ट्विट?

बानो यांच्या नावे असलेल्या या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ''भूखंड माफिया समीर भोजवानी याची तुरूंगातून सुटका झाली आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आश्वासन मिळूनही त्याच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. एका पद्मविभूषीत व्यक्तीला पैसे आणि बळाचा वापर करत धमकावण्यात येत आहे. या प्रकरणीच मला मुंबईत आपली भेट घ्यायची आहे.''

पंतप्रधान मोदी मंगळवारी मुंबईत येणार असून, आता ते आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत बानू यांचं म्हणणं ऐकून घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.हेही वाचा-

भयपटांचा बादशहा तुलसी रामसे यांचं निधन

Exclusive Interview: अबरामसारखा निरागस आहे बऊआ - शाहरुख खानRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा