Advertisement

Exclusive Interview: अबरामसारखा निरागस आहे बऊआ - शाहरुख खान

बऊआ मनाने खूप चांगला आहे. खूप साधा आणि मेरठमध्ये राहणारा आहे. मनात आहे ते बिनधास्तपणे बोलणारा आहे. त्यामुळे हे कॅरेक्टर साकारताना खूप मजा आली. हे कॅरेक्टर दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी माझ्याकडून करवून घेतलं हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे.

Exclusive Interview: अबरामसारखा निरागस आहे बऊआ - शाहरुख खान
SHARES

काही वर्षांपूर्वी आलेल्या 'अप्पू राजा' या चित्रपटात अभिनेता कमल हासनने बुटक्या नायकाची भूमिका साकारली होती. त्यावेळी सर्वांनीच तोंडात बोटं घातली होती. आता 'झीरो' या चित्रपटात पुन्हा एकदा एका बुटक्या नायकाची कथा पाहायला मिळणार आहे. शाहरुख खानने आपल्या स्टारडमच्या साथीने या चित्रपटातील बऊआ हा नायक साकारला आहे. 

वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी 'झीरो'चं दिग्दर्शन केलं असल्याने या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सोबत आहेत अनुष्का शर्मा आणि कतरीना कैफ या दोन देखण्या अभिनेत्री. त्यामुळे शाहरुख या चित्रपटात उंचीने जरी लहान असला तरी अपेक्षा मात्र आभाळाएवढ्या आहेत. 'मुंबई लाइव्ह'शी संवाद साधताना शाहरुखने बऊआ साकारण्यामागील मूळ भावना स्पष्ट केली.


असा आहे बऊआ

बऊआ मनाने खूप चांगला आहे. खूप साधा आणि मेरठमध्ये राहणारा आहे. मनात आहे ते बिनधास्तपणे बोलणारा आहे. त्यामुळे हे कॅरेक्टर साकारताना खूप मजा आली. हे कॅरेक्टर दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी माझ्याकडून करवून घेतलं हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. एकूणच खूप वेगळा अनुभव होता. तुम्हा सर्वांनाही हा नक्कीच आवडेल. अशा प्रकारचं कोणतीही धाडसी भूमिका साकारायला कोणत्याही कलाकाराला आवडत असतं. त्यामुळे हे आव्हान स्वीकारताना थोडीही भीती नव्हती.


असा असतो हिरो

मला असं वाटतं की, कोणतंही कॅरेक्टर जेव्हा तुम्ही साकारता तेव्हा ते आतून येणं गरजेचं असतं. आपण बऱ्याच वर्षांपासून जो हिरो चित्रपटात पाहात आलो आहोत तो लार्जर दॅन लाईफ असतो. हिरो सर्वात सुंदर असतो. मोटारसाईकलवरून वेगात एंट्री घेतो. त्याचे सिक्स पॅक अॅब्ज असतात. बऊआ हा स्वभावाने चांगला आहे. मी स्वत:च तो साकारल्याने तो माझ्या मनात वसला आहे. आपला हिरो मोठ्या बिल्डिंगवरून उडी मारतो. महिलांचं रक्षण करतो. नाइट क्लबमध्ये जातो तेव्हा तो इतका चांगला डान्स करतो की सर्व जण हैराण होतात. सारं काही करतो. पण हा तसं काहीही करण्याच्या भानगडीत पडत नाही. 


स्मॅालर दॅन लाईफ...

आम्ही स्मॅालर दॅन लाईफ हिरो आणला आहे. मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात लोकलमधून फिरताना असे हिरो पाहिले आहेत, ज्यांना असं वाटतं की आज मी रिक्षाने घरी गेलो नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वाचवू शकतो. हे लहानसहान गोष्टींमध्ये स्वत: त्रास सहन करतात, थकतात, पण मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वाचवतात. हेच आहेत स्मॅालर दॅन लाईफ हिरो. आपण हिंदी चित्रपटात जे हिरो पाहतो जे मीसुद्धा केले आहेत ते सुपरहिरो टाईपचे असतात. मी साकारलेले राज, राहुल, करण-अर्जुन हे लार्जर दॅन लाईफ आहेत.


बराबरी की बात

जेव्हा आम्ही हा चित्रपट बनवत होतो तेव्हा क्वालिटीवर लक्ष द्यायचं ठरलंच होतं. त्यानुसार पुढे कामही केलं गेलं. पटकथेपसून संवादांपर्यंत सर्व गोष्टी बारकाईने सादर केल्या गेल्या आहेत. यात एक सुरेख लाईन आहे. 'रिश्ता बराबरी का अब हुआ है बऊए'. चित्रपटात अनुष्काने साकारलेली आफिआ बऊआला भेटून खुश होते. कारण तो तिच्यावर दया दाखवत नाही. तो तिच्याशी नॅार्मल वागतो. तिला तो यासाठी चांगला वाटतो की हा आपल्याला स्पेशल ट्रीट करत नाही. हा आपल्याशी सर्वसामान्यांप्रमाणे वागतो. बऊआकडे स्पष्टवक्ते असतो. तोच तिला भावतो.


सहानुभूती नाही

या चित्रपटात आम्ही एका गोष्टीची कटाक्षाने काळजी घेतली आहे ती म्हणजे यात एकही सीन असा नाही ज्यात बऊआवर दया दाखवावी असं कोणालाही वाटेल. बरोबरी त्यांच्याशी दाखवायला हवी ज्यांना त्याची खरी गरज आहे. त्यांना तुम्ही सहानुभूती दाखवायला जाल तर ते स्वीकार करणार नाहीत. या चित्रपटात आम्ही तीच गोष्ट टाळली आहे. बऊआला सादर करण्यामागे हीच विचारधारा आहे. तो इतका साधा आणि बेधडक आहे की एखादी गोष्ट तो कोणाला बोलला आणि समोरच्याला वाईट वाटलं तर त्याला वाईट का वाटलं हेसुद्धा त्याला समजत नाही. हेच या चित्रपटाचं सौंदर्य आहे.


आनंद मिळतो ते करतो

नाम, फेम अँड मनी आल्यावर एक्साइट होण्यापासून स्वत:ला वाचवणं फार कठीण असतं. कारण एक स्वप्न पूर्ण झाल्यावर दुसऱ्याचे वेध लागतात. दिल्लीत होतो तेव्हा आई म्हणायची की, चांदीच्या ताटात जेवल्याने जेवणाची क्वालिटी सुधारत नाही. जेवणानंतर कोणी ताट खात नाही किंवा बरोबर घेऊन जात नाही. त्याप्रमाणेच नाव तरी किती होणार? त्यापेक्षा मला ज्यामुळे आनंद मिळतो ते करायला आवडतं. केवळ लाईफचा स्पीड मेंटेंन करण्यासाठी काहीतरी करत राहणं गरजेचं असतं. बऊआही असाच आहे. त्यामुळेच तो सर्वांना आवडेल.


अबरामलाही आवडला

कतरीनाचं एक गाणं येणार आहे. ते मी घरी दाखवत होतो. घरात आणखीही काही लोकं होती त्यामुळे गाण्यानंतर मी त्यांच्यासोबत ट्रेलरही पाहात होतो. ते ऐकून अबराम धावत आला. अबराम येईपर्यत ट्रेलर संपला. त्यावर तो म्हणाला की, 'हा तोच चित्रपट आहे ना ज्यात तुम्ही माझ्यासारखी अॅक्टींग केली आहे?' त्याने अगोदरही ट्रेलर पाहिला होता. त्यामुळे बऊआ हा आपल्यासारखाच आहे हे त्याला ठाऊक होतं.


जास्त विचार करत नाही

मी कोणताही चित्रपट प्रेक्षकांसाठी बनवतो. एक मात्र खरं आहे की चित्रपट बनवताना कोणत्या प्रकारचे प्रेक्षक तो पाहतील याचा मात्र नक्कीच विचार करतो. 'फॅन' बनवला तेव्हा त्याला कशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतील याची कल्पना होती. 'हॅप्पी न्यू ईअर' बनवला तेव्हा खूप लोकं हा चित्रपट एन्जॅाय करतील असं वाटलं होतं. त्यामुळे पुढे काय होईल याचा विचार करण्यापेक्षा चांगलं काम करत राहायचं हेच ठाऊक आहे. हा चित्रपट खूप वेगळा असल्याने अपेक्षा आहेतच.


अनुष्का-कतरीनासोबत पुन्हा एकदा

दोघीही खूप सुंदर अभिनेत्री आहेत. एव्हाना आमचं खूप चांगलं ट्युनिंग जुळलं आहे. अनुष्काने पहिलाच चित्रपट माझ्यासोबत केला असल्याने तिच्या सुरुवातीच्या काळापासून चांगलीच परिचयाची आहे. यापूर्वीच्या चित्रपटातील आम्हा तिघांची टिम प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यामुळे ती केमिस्ट्री या चित्रपटातही कामी आली आहे. दोघीही प्रोफेशनल अॅक्ट्रेस असल्याने त्यांच्यासोबत काम करताना मजा येते.हेही वाचा - 

Exclusive Interview: ... तर आम्ही घरात घुसून मारू- विकी कौशल
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा