Advertisement

जमता जमता फसलेली कलाकृती...


जमता जमता फसलेली कलाकृती...
SHARES

मुंबई - बहुतेक चित्रपट पूर्णतः जमतात किंवा पूर्णतः फसतात. मात्र काही चित्रपट असे असतात की ते जमता जमता फसतात. नुकताच प्रदर्शित झालेला 'बद्रीनाथ की दुल्हनियाँ' हा चित्रपट अशाच जमता जमता निराश करणाऱ्या कलाकृतींपैकी एक आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध अगदी धमाल आहे. मध्यांतराला एक नाट्यमय वळणही आहे. मात्र मध्यांतरानंतर चित्रपट लेखनाच्या पातळीवर शून्याची पातळी गाठतो आणि तिथून चित्रपटाला वर यायला भयंकर कष्ट घ्यावे लागतात. हे कष्ट सार्थकी लागेपर्यंत चित्रपटाचा शेवट जवळ आलेला असतो. फसलेल्या चित्रपटाला जमण्याच्या मार्गावर आणणाऱ्या दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे आलिया भट आणि वरुण धवन. या दोघांनी आपल्या प्रसन्न आणि अगदी नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर चित्रपट सुसह्य केला आहे.

पाहायला गेलं तर 'हम्टी डम्टी शर्मा की दुल्हनियाँ' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. मात्र कलाकार आणि दिग्दर्शक सोडला तर पूर्वीच्या भागाशी हा चित्रपट आपलं काहीच नातं सांगत नाही. चित्रपट घडतो तो झाशीमध्ये. बद्रीनाथ बन्सल (वरुण धवन) हा एका कर्मठ व्यावसायिकाच्या घरात वाढलेला मुलगा. पैसा, प्रतिष्ठेपायी स्त्रियांच्या मानमर्यादेला जराही किंमत न देण्याचाच बद्रीच्या वडिलांचा खाक्या. त्यामुळेच बद्रीच्या सख्ख्या भावाच्या पत्नीच्या अंगी हुशारी असूनही तिला योग्य तो सन्मान मिळत नसतो. ही खंत मनी बाळगणाऱ्या ब्रदीचं मन जडतं ते वैदेही त्रिवेदी (आलिया भट) या तरुणीवर. मात्र एका प्रेमप्रकऱणात पोळलेली नि आता करिअरवर फोकस्ड असलेली वैदेही बद्रीनाथच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार देते. मात्र मोठ्या बहिणीच्या विवाहातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन तिला आपला निर्णय बदलावा लागतो. बद्रीबरोबर लग्नास होकार देणारी वैदेही बोहल्यावर चढण्यास काही मिनिटं असताना अचानक पळून जाते. मुंबई गाठून ती तिथं एअर होस्टेसचं ट्रेनिंग घेते नि नोकरीसाठी सिंगापूरला निघूनही जाते. बन्सल कुटुंबियांसाठी हा मोठा अपमानाचा क्षण असतो. या अपमानाचा बदला घेण्यासाठी बद्री आपल्या मित्रासह प्रथम मुंबई आणि नंतर सिंगापूरला दाखल होतो. मात्र वैदेहीकडून बोहल्यावरून ऐनवेळी पळ काढण्यामागचं सत्य कळल्यानंतर तो तिच्यात अधिकच गुंतत जातो. या दोघांचं प्रेम बन्सल कुटुंबियांमध्ये पुढे काय हलचल करतं, हे पडद्यावरच पाहिलेलं चांगलं.


शशांक खेतान यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध या लेखकानं खूप छान लिहिलाय. बद्री आणि वैदेही यांच्या नात्यामधील केमिस्ट्री त्यानं छान पडद्यावर आणलीय. त्यासाठी हलक्याफुलक्या विनोदाची खूप छान साथ त्यानं घेतलीय. बद्रीच्या मित्राची व्यक्तिरेखाही खूप छान विकसित झालीय. त्यामुळे चित्रपटाचा पूर्वार्ध अगदी हसताखेळता प्रवास झालाय. खेतान यांच्यामधील लेखक फसलाय तो उत्तरार्धात. सिंगापूरला गेलेल्या नायक-नायिकांना पुन्हा एकत्र आणण्यात लेखक-दिग्दर्शकाची खूपच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे हा भाग अत्यंत कंटाळवाणा झाला आहे. चित्रपटाचा शेवटही अगदीच ओढूनताणून केल्यासारखा वाटतो. वरुण धवन आणि आलिया भट चित्रपटाची जान आहेत. हे दोघेही प्रत्येक चित्रपटागणिक आपल्या अभिनयाची उंची वाढवत आहेत. या चित्रपटाच्या विरूद्ध जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्याचं साधारण संगीत. कोणतीच चाल आकर्षक नसल्यामुळे दिग्दर्शकाला 90च्या दशकामधील 'तम्मा तम्मा' या हिट गाण्याची गरज भासलीय. परंतु, त्याचं रिमिक्स वर्जनही म्हणावं तसं जमलेलं नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा