Advertisement

प्रेमत्रिकोणाच्या रंगात रंगला 'रंगून'


प्रेमत्रिकोणाच्या रंगात रंगला 'रंगून'
SHARES

मुंबई - रुपेरी पडद्यावर काहीतरी मिनिंगफुल हवं असेल तर अलीकडच्या काळात विशाल भारद्वाजव्यतिरिक्त आणखी दुसरं नाव पटकन सांगता येणार नाही. शेक्सपिअरच्या लेखणीतून उतरलेल्या कथानकांना अस्सल भारतीय रूप देत या दिग्दर्शकानं काही उत्तम चित्रपट गेल्या काही वर्षांमध्ये दिले आहेत. रंगून हा चित्रपट त्याच रंगाबरोबरचं आपलं नातं आणखी गडद करणारा आहे. या चित्रपटाला दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असली तरी चित्रपटाचं कथानक प्रेमत्रिकोणात रंगून गेलंय. भारद्वाज यांच्या यापूर्वीच्या चित्रपटात पाहायला मिळालेली रक्तरंजित नातेसंबंध इथंही पाहायला मिळतात. चित्रपटाची वाढलेली लांबी, साधारण संगीत आणि काही रेंगाळलेले प्रसंग सोडले तर रंगूनच्या रंगात आपण पूर्णपणे रंगून जातो. विशाल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनातील नेटकेपणाला छायालेखक आणि कलावंतांच्या प्रमुख टीमची छान साथ मिळाली आहे.

रुसी बिलीमोरिया (सैफ अली खान), ज्युलिया (कंगना राणावत) आणि नवाब मलिक (शाहिद कपूर) या तीन पात्रांभोवती हा चित्रपट फिरतो. चित्रपटाचं कथानक घडतं ते दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर. रुसी हा स्वातंत्र्यपूर्व काळात बनणाऱ्या स्टंट चित्रपटांमध्ये काम करीत असतो. तसेच तो अशाप्रकारच्या चित्रपटांची निर्मितीही करीत असतो. ज्युलिया ही त्याच्या चित्रपटांमध्ये काम करीत असते. रुसी हा ज्युलियाचा मेण्टॉर असतो, तसेच या दोघांचं परस्परांवर प्रेमही असतं. भारत-ब्रह्मदेशाच्या सीमेवर भारतीय तसेच ब्रिटीश जवानांच्या मनोरंजनासाठी ज्युलियाला पाठवलं जातं. तिथं काही कारणास्तव रुसी जाऊ शकत नाही. तेव्हा ज्युलियाच्या संरक्षणाची जबाबदारी जवान नवाब मलिकवर सोपविली जाते. याचवेळी या मनोरंजन तुकडीवर परकीयांचा हवाई हल्ला होतो आणि ज्युलिया-नवाब एका जंगलात अडकतात. तिथल्या असंख्य अडचणींवर मात करीत ज्युलियाची सुटका करण्यात नवाबला यश येतं. इतके दिवस रुसीच्या प्रेमात असलेल्या ज्युलियाचं मन बदलतं आणि आता ती नवाबवर प्रेम करू लागते. त्याच्याकडूनच तिला भारतीय स्वातंत्र्यासाठी आपलंही योगदान देण्याचा मार्ग सापडतो. मात्र त्यादरम्यान रुसीला या दोघांची प्रेमकहाणी कळते आणि वेगळंच नाट्य समोर येतं.

चित्रपटाला दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी लाभली असली तरी लेखक-दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी आपला सगळा फोकस हा प्रेमत्रिकोणावरच ठेवलेला आहे. मॅथ्यू रॉबीन्स, सबरीना धवन यांच्यासोबत भारद्वाज यांनी चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे. ज्युलिया हे पात्र फिअरलेस नादियावर बेतलेलं असलं तरी कॉपीराईटच्या कारणास्तव दिग्दर्शकानं त्यात बरेच बदलही केले आहेत. चित्रपटाला प्रेमत्रिकोणाचं स्वरूप दिल्यामुळे कथानकात तसं फारसं काहीच नावीन्य जाणवत नाही. प्रेक्षकाला पुढं काय घडणार आहे, याचा आधीच अंदाज येतो. मात्र भारद्वाज यांनी दिग्दर्शनातील आपलं कौशल्य पणाला लावत ही त्रुटी झाकण्याचा कसोशीनं प्रयत्न केला आहे. ज्युलिया-रुसीची सुरुवातीची प्रेमकहाणी, ज्युलिया-नवाबची भेट, जंगलामध्ये या दोघांना करावा लागलेला संघर्ष आणि त्यानंतर त्यांचा प्रेमात पडण्याचा भाग चांगलाच लांबला आहे.

मध्यंतरानंतर पुन्हा एकदा कथानकाची गाडी ट्रॅकवर आणण्यात दिग्दर्शकाला यश आलंय. ज्युलिया-रुसी-नवाब हा प्रेमत्रिकोण उत्तरार्धात भरपूर नाट्य निर्माण करतो. चित्रपटाचा शेवटही छान झालाय. मात्र पूर्वीच उल्लेखिल्याप्रमाणे हे सगळं पडद्यावर साकारताना भारद्वाज चित्रपटाच्या लांबीत कपात करू शकले नाहीत. चित्रपट सुमारे पावणेतीन तास लांबीचा असून तो किमान 15-20 मिनिटे कापला असता तर अधिक सुसह्य झाला असता.

सैफनं रुसी बिलिमोरिया ही व्यक्तिरेखा अत्यंत सहजतेनं साकारली आहे. पूर्वार्धात जवळपास गायब असलेली ही व्यक्तिरेखा उत्तरार्धात चित्रपटाचा ताबा घेते आणि तिथंच सैफ आपली छाप उमटवून जातो. शाहिदनंही नवाबच्या व्यक्तिरेखेची वेगळी शेड बरोबर पकडली आहे. प्रेमत्रिकोणाच्या दोन कोनांमधील तिसरा कोन कंगना राणावत असल्यामुळे साहजिकच तिच्या व्यक्तिरेखेला चांगले प्रसंग आले आहेत आणि तिनं ते छान सादर केले आहेत. कंगनाचा प्रवास आता एका उत्कृष्ट अभिनेत्री बनण्याच्या दिशेनं होतोय, त्याची खात्री या चित्रपटातदेखील सतत येते. या तिघांच्या अभिनयाव्यतिरिक्त इतर कलावंतांनीही आपल्या व्यक्तिरेखा छान साकारल्या आहेत. विशेष उल्लेख करायला हवा तो छायालेखक पंकजकुमार यांचा. अरुणाचल प्रदेशमधला निसर्ग आणि चित्रपटाच्या पूर्वार्धामधील चित्रीकरणाची दृश्यं त्यांनी छान घेतली आहेत. गुलजार-विशाल भारद्वाज या प्रभावी कॉम्बिनेशनकडून संगीतामध्ये म्हणावी तशी कामगिरी घडलेली नाही. एक-दोन गाणी सोडली तर हे संगीत लक्षात राहत नाही. मुख्य संगीताच्या तुलनेत चित्रपटाचं पार्श्वसंगीत अधिक आकर्षक आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा