Advertisement

R R R : रामायण, राष्ट्रप्रेम, राजामौली


R R R : रामायण, राष्ट्रप्रेम, राजामौली
SHARES

भव्यतेसमोर प्रेक्षकांचे कर जुळतात. ही बाब आपल्याकडच्या फिल्ममेकर्सना उत्तमरीत्या माहीत आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांचे बरं का. रसिकांचे नाहीत. कारण तथातथित नाववाल्या कलाकारांचा फौजफाटा, ‘मिडास टच’वाला दिग्दर्शक, नयनरम्य लोकेशन्स, आयटम सॉँग यातलं काहीएक नसताना केवळ उत्तम कथानक, मांडणीला अनेक चित्रपट सिने रसिकांनी बॉक्स ऑफीसवर यश मिळवून दिलं आहे. असो. इथे विषय भव्यतेचा आहे आणि दिग्दर्शक एस एस राजामौलीचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित चित्रपट आर आर आर या कसोटीवर शंभर पैकी शंभर गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. राजामौलीने दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट बाहुबली- द कन्क्लुजन २०१७ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी त्याचा नवा चित्रपट आर आर आर प्रेक्षकांसमोर आला आहे. दोन कलाकृतींमध्ये पाच वर्षांची गॅप का? या प्रश्नाचं उत्तर आर आर आर च्या फ्रेम न फ्रेम मध्ये मिळत जातं. कलाकारांची निवड, व्हीएफएक्स, थरारक साहस दृश्यं, छायांकन (cinematography) सगळं अगदी ‘लॅविश’! चकचकीत! टिपिकल साऊथ स्टाइलमध्ये आर आर आर म्हणजे ‘राइज, रिव्होल्ट, रिवेंज’ चा कधी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा तर कधी उसळायला लावणारा थरार प्रसंगाचा प्रवास तब्बल तीन तास दहा मिनिटं सुरु राहतो. 

आर आर आरचं कथानक आपल्या देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातलं आहे. दख्खन प्रांतातल्या आदिलाबादजवळच्या जंगलात घटनाक्रम सुरु होतो आणि दिल्लीनजिक स्थिरावतो. आग आणि पाणी यांची प्रतिकं म्हणून चित्रपटातल्या नायकांची अनुक्रमे रामाराजू (राम चरण) आणि भीम (ज्यु. एन टी आर) यांची ओळख करुन देणारे प्रसंग येतात. ब्रिटिशांची नोकरी करणारा, वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी प्राणांचीही तमा न बाळगणारा भडक डोक्याचा, कर्तव्यकठोर, निडर पोलीस अधिकारी रामाराजू हा FIRE मधला R तर साधा भोळा, पापभीरु, वेळप्रसंगी उग्र रुप धारण करणारा भीम हा WATER मधला  R. विशिष्ट परिस्थितीत एकमेकांना भेटलेल्या या दोघांचीही आपसात घट्ट मैत्री होते. आदिलाबादजवळच्या जंगलात वसलेल्या गोंडा समाजातला त्यांच्या कबिल्यातल्या माली या लहान मुलीला ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी आलेला भीम आणि आपल्या वेगळ्याच मिशनवर काम करणारा रामाराजू आपापली ओळख एकमेकांपासून अनाहुतपणे लपवून ठेवतात. सत्य समोर आल्यानंतर काय घडतं, हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं.

राम चरण आणि ज्यु. एनटीआर यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री भन्नाट आहे. काही प्रसंगांमध्ये ती सत्तरच्या दशकातल्या अमिताभ बच्चन-विनोद खन्ना जोडीची आठवण करून देते. साऊथच्या दोन्ही मेगा स्टार्सच्या व्यक्तिरेखांमध्ये समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक एस एस राजामौलीने केल्याचं जाणवतं. कमाईचे नवनवे विक्रम करणाऱ्या डब्ड मुव्ही ‘पुष्पा’ची लाट ओसरत असताना आर आर आऱ चा नवा पर्याय साऊथ इंडियाच्या फिल्म इंडस्ट्रीने प्रेक्षकांना दिलाय. यातलं राम चरण आणि ज्यु एनटीआर वर चित्रित झालेलं ‘नाचो नाचो’ हे गाणं धम्माल उडवून देणार, हे नक्की. यात अजय देवगण आणि आलिया भट्टदेखील आहेत. दोघांची भूमिका स्पेशल अपेरियन्स प्रकारात मोडणारी आहे. आलिया राम चरणच्या होणाऱ्या बायकोची, सीताची छोटीशी भूमिका केली आहे. तिच्या वाट्याला मोजून दहा-पंधरा मिनिटांचा स्क्रीन टाइम आहे. तिने हा रोल का स्वीकारला असावा, या प्रश्नाचं उत्तर या भव्य चित्रपटात छोटीशी व्यक्तिरेखा रंगवण्यासाठी तिने आकारलेल्या काही कोटी रु. मानधनाच्या कथित आकड्यामध्ये लपलं आहे. अजय देवगणने राम चरणशी असलेल्या दोस्तीसाठी यात काम केलं असण्याची शक्यता आहे. राम चरणच्या काही हिंदी चित्रपटांसाठी अजयने डबिंग केलं आहे,  हे आपल्याला माहीत आहेच. आर आर आरच्या प्रमोशनसाठी दिलेल्या मुलाखतीत राजामौलीने यात हिंदीतला एक सुपरस्टार असणं गरजेचं होतं, असं सांगितलं होतं. इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये भीमचं प्रेमपात्र झालेल्या जेनी म्हणजे ऑलिव्हिया मॉरीसचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मोहक दिसण्याबरोबरच वाट्याला आलेलं कामही तिने चांगलं केलंय. जेनीमध्ये ‘लगान’ च्या भुवनला मदत करणाऱ्या एलिझाबेथचं प्रतिबिंब दिसतं. किंग स्कॉट (रे स्टिव्हन्सन), लेडी स्कॉट (एलिजन डुबी) यांच्या खलनायकी व्यक्तिरेखाही चांगल्या जमल्या आहेत. 

सिनेमा तीन तास १० मिनिटांचा आहे. एरवी तो तीन तास ४० मिनिटांचा झाला असता. या वेळेत पडद्यावर सतत काहीतरी घडत असतं. काही प्रसंगांना कात्री लावताना एडिटर श्रीकर प्रसादची बरीच दमछाक झाली असेल. यातली हाणामारीची दृश्यं कमाल आहेत. योग्य ठिकाणी स्लो मोशनचा वापर सीनची परिणामकता वाढवतो. हे श्रेय सिनेमॅटोग्राफर के के सेंथील कुमारचं. यातले स्टंट सीन्स कमाल आहेत. आपल्याला पडद्यावर जे दिसतंय ते घडणं शक्य नाही, हे ठाऊक असूनही त्यातल्य एक्शन सीन्सने आपण प्रभावित होतो, यातच बरंच काही आलं.      

एक डिस्क्लेमर द्यावाच लागेल. हा सिनेमा अनेक अतर्क्य घटनांनी भरलेला आहे. तो पाहत असताना का?कधी?कसं? हे प्रश्न तुम्हाला पडले तर उत्तरं शोधण्याच्या फंदात पडू नका. धरम वीर, क्रांती, खून पसीना, अमर अकबर एन्थोनी, बाहुबली, संजय लीला भंसालीचा कोणताही चित्रपट आणि सर्वावर कढी म्हणजे रामायणाचा प्रभाव आर आर आर वर दिसत राहतो. मनमोहन देसाई यांचा चित्रपट संजय लीला भंसालीच्या स्टाइलमध्ये मांडला तर कसा वाटेल? तसाच आहे आर आर आर. तेलुगूत रौद्रम, रणम, रुधीरम शीर्षक असलेला आर आर आर चा लॉँग फॉर्म हिंदीत  आधी म्हटल्याप्रमाणे ‘राइज, रिव्होल्ट, रिवेंज’ म्हणून सामोरा येतो. फार डोक्याने विचार न करता मुख्य म्हणजे ‘बाहुबली’च्या मेकरने भव्यतेच्या बाबतीत टाकलेलं पुढचं पाऊल पाहण्यासाठी थिएटरला भेट देऊन एकदा हा सिनेमा पाहायला हवा. खिशाचा विचार करता फक्त एकदाच... पण थिएटरमध्येच. कारण चित्रपटाची भव्यता ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनुभवता येणार नाही. 

***and half   (Three and half stars) 

सचिन परब

sachinparabonline@gmail.com    Twitter: @thesachinparab

लेखक ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ असून त्यांनी सुमारे २३ वर्षांच्या आजवरच्या पत्रकारिता प्रवासात अनेक राष्ट्रीय हिंदी, मराठी वृत्त वाहिन्यांसाठी संपादक तसेच वरिष्ठ पदांवर काम केले आहे. प्रिंट, टीव्ही, वेब मीडिया, रेडिओ अशा सर्व माध्यमांमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले पत्रकार, व्य़ाख्याते, पुरस्कार विजेते लेखक, फिल्ममेकर आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक म्हणून ते परिचित आहेत. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा