Advertisement

‘फिल्मीदेश’ नेणार जगभरात मराठी चित्रपट

भारतातील प्रादेशिक चित्रपटांना भारताबाहेर हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘फिल्मीदेश’ हा उपक्रम मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांची गुंतवणूक सत्कारणी लावणारा ठरणार आहे.

‘फिल्मीदेश’ नेणार जगभरात मराठी चित्रपट
SHARES

मराठी मनोरंजन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आज बऱ्याच संघटना नवनवीन पावलं उचलत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना भारताबाहेर जरी मोठी पसंती मिळत असली, तरी वितरण निर्बंधामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या जागतिक प्रसारणासाठी चित्रपट निर्माते नितीन केणी आणि मनीष वशिष्ट ‘फिल्मीदेश’ हा अनोखा उपक्रम जगभर राबवणार आहेत.


वितरणातील मोठं नाव

मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत निर्मिती आणि वितरणक्षेत्रात नितीन केणी यांचं नाव मोठं आहे. ‘गदर’, ‘रुस्तम’, ‘लंच बॉक्स’ या हिंदीतील सिनेमांसाठी आणि ‘सैराट’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘दुनियादारी’, ‘टाइमपास’, ‘लय भारी’ या मराठी चित्रपटांच्या यशात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. नितीन केणी झी स्टुडियोचे माजी सीईओ असून, त्यांनी झी स्टुडियोला नव्या उंचीवर नेण्यास महत्वाची भूमिका बजावली होती. 


परदेशात मराठी सिनेमा

मनोरंजन क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या नितीन केणी यांचा ‘फिल्मीदेश’ हा उपक्रम मराठी सिनेमांसाठी भावी काळात फायदेशीर ठरणार आहे. या उपक्रमांतर्गत, परदेशातील स्थानिक मराठी प्रेक्षकांच्या नजीकच्या सिनेमागृहात मराठी सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. त्यासाठी जागतिक स्तरीय ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ’चा कार्यभाग सांभाळणारे बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले यांचं मोलाचं सहकार्य त्यांना लाभलं आहे.


हक्काचं व्यासपीठ

याद्वारे मराठी चित्रपट जगभरातील प्रसिद्ध सिनेमागृहात दाखवले जाणार असून, चित्रपट वितरणाबरोबरच जनसंपर्क आणि प्रसारमाध्यमाचं कार्यदेखील याअंतर्गत पार पाडलं जाणार आहे. भारतातील प्रादेशिक चित्रपटांना भारताबाहेर हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘फिल्मीदेश’ हा उपक्रम मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांची गुंतवणूक सत्कारणी लावणारा ठरणार आहे.


वितरण मर्यादा

अमेरिकेत मराठीचा वारसा जपणारे बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर अमेरिकेत दीड लाखाहून अधिक मराठी भाषिक कुटुंबं राहतात. त्यामुळे या भागात मराठी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला अधिक वाव आहे. मात्र, संघटीत वितरणाच्या मर्यादेमुळे मराठीतल्या अप्रतिम कलाकृती स्थानिक लोकांपर्यंत पोहोचत नाहीत.


अर्थकारणास चालना

विषयांच्या वैविध्यामुळे या उपक्रमाद्वारे अमराठी प्रेक्षकांनाही आकर्षित करता येईल आणि एकप्रकारे कलाकृती ते कलासक्ती अशी मूल्यप्रणाली निर्माण करता येईल. या उपक्रमाद्वारे मराठी चित्रपटाच्या अर्थकारणास चालनादेखील मिळेल. परदेशी उत्पन्न आणि देवाणघेवाण वाढीमुळे मराठी चित्रपटसृष्टीचा जागतिक व्यवहार उंचीवर जाण्यास मदत होईल असंही चौघुले यांचं म्हणणं आहे.



हेही वाचा -

‘ऐ वतन...’ गाण्याचा प्रकाशन सोहळा संपन्न

रहस्य वाढवणार ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा