Advertisement

अभिनयासाठी ताजमधील नोकरीला ‘तिने’ ठोकला रामराम

मध्यमवर्गीय कुटुंबातील प्राजक्ता परब या तरुणीनेही हॅाटेल इंडस्ट्रीतील आपल्या सहा वर्षांच्या करियरवर पाणी सोडत अभिनयाची निवड केली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालेल्या ‘ललित २०५’ या मालिकेत प्राजक्ता भूमिका साकारत आहे.

अभिनयासाठी ताजमधील नोकरीला ‘तिने’ ठोकला रामराम
SHARES

भारतातील अग्रगण्य पंचतारांकीत ताज हॅाटेलमधील असिस्टंट मॅनेजरची नोकरी... व्हीआयपींना अटेंड करण्याचं काम... मनाजोगता पगार... प्लस इन्सेंटिव्ह... असं असताना जर तो जॅाब सोडून एखाद्याने मृगजळासमान असणाऱ्या अभिनयामागे धाव घेतली, तर त्या व्यक्तीला वेडी नाहीतर काय म्हणणार? पण वेडेच इतिहास घडवतात असं म्हटलं जातं.

मध्यमवर्गीय कुटुंबातील प्राजक्ता परब या तरुणीनेही हॅाटेल इंडस्ट्रीतील आपल्या सहा वर्षांच्या करियरवर पाणी सोडत अभिनयाची निवड केली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालेल्या ‘ललित २०५’ या मालिकेत प्राजक्ता भूमिका साकारत आहे. या मालकेसाठी प्राजक्ताने ताजमधील नोकरीला रामराम ठोकला आहे. याबाबत प्राजक्ताने ‘मुंबई लाइव्ह’शी खास बातचीत केली.


बालपणापासून अभिनयाची आवड

किंग्ज जॅार्ज शाळेत शिकत असल्यापासून मला अभिनयाची आवड होती. बालनाट्य, नृत्य स्पर्धांमध्ये परफॅार्म केल्याने बालवयातच अभिनयाची गोडी लागली. शाळेत असताना केलेला अभिनय इतकीच शिदोरी गाठीशी होती. बाबांना मात्र माझं अभिनय करणं आवडत नव्हतं. आईदेखील अभ्यासाकडे लक्ष देण्यावर भर द्यायची. मला आई-बाबांच्या विरोधात जाऊन काही करायचं नव्हतं, म्हणून थांबले. प्रथम शिक्षण पूर्ण केलं. हॅाटेल मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेतलं.


पंचतारांकित हॅाटेलमध्ये सेवा

सहा वर्षांच्या करियरमध्ये ताजसोबतच ओबेरॅाय आणि सेंट रेगीज या पंचतारांकीत हॅाटेल्समध्ये काम केलं. ताजमध्ये असिस्टंट मॅनेजर असल्याने हॅाटेलमध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या गेस्टना सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे बऱ्याच व्हीआयपीजच्या ओळखी झाल्या. रजनीकांतसरांपासून सचिन तेंडुलकरसरांपर्यंत सर्वजण मला ओळखतात. 


रजनीकांत ते सचिन तेंडुलकर

नागार्जुन, ब्रेट ली, रेखा, श्रीदेवी, शाहरुख खान, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकी श्रॅाफ यांसारख्या दिग्गजांचा पाहुणचार करण्याची संधी लाभली. त्यामुळे अभिनयात येणं माझ्यासाठी कठीण नव्हतं. पण मला संघर्ष करून स्वत:ला घडवायचं आहे.


रात्रीची झोप उडाली

ताजसारखी नोकरी असूनही मला रात्री झोप लागत नव्हती. अभिनय करायला मिळत नसल्याने कित्येकदा रात्रभर तळमळायचे. एक दिवस खूप विचार केला आणि सर्व शक्ती एकवटून बाबांना माझा निर्णय सांगितला. बाबांनी हसतमुखाने होकार दिल्याने पुढील वाटचाल सोपी झाली.


आॅडिशन आणि निवड

अनुभव नसतानाही ‘ललित २०५’साठी आॅडिशन द्यायला गेले. अभिनयाचं कोणतंही प्रशिक्षण घेतलं नाही की, कार्यशाळा केली नाही. पण अभिनय करण्याची जिद्द होती. मोठ्या धीराने आॅडिशन दिली आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं.


सारा राजाध्यक्ष

ही मालिका आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम यांची निर्मिती आहे. माझा इंग्रजी भाषेवर जास्त भर असल्याने सुचित्राताईंना हवी तशी मुलगी माझ्यात दिसली. दोन टेक आॅडिशन्स घेतल्या आणि त्यांनी माझी निवड केली. त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. या मालिकेत मी सारा राजाध्यक्ष ही व्यक्तिरेखा साकारली आहे. पहिलाच सीन आवडत्या गणपती बाप्पासोबत असल्याने भीती परागंदा झाली आणि आत्मविश्वास दुणावला. सुहासमावशी (सुहास जोशी) यांच्याकडून अॅक्शन-रिअॅक्शनचं टायमिंग शिकले. सर्वजण सहकार्य करत आहेत.



हेही वाचा - 

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या जन्मदिनानिमित्त 'विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा'

आता 'अशी' दिसते सोनाली बेंद्रे !




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा