Advertisement

‘बाहुबली २’ मधील कुमार वर्माच्या आवाजात बोलणार ‘ड्रॅक्युला’


‘बाहुबली २’ मधील कुमार वर्माच्या आवाजात बोलणार ‘ड्रॅक्युला’
SHARES

काही कलाकार केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर आवाजासाठीही ओळखले जातात. यापैकी काहीजण स्वत: न साकारलेल्या व्यक्तिरेखांनाही आपला आवाज देतात. मराठी सिनेसृष्टीतही असे बरेच कलावंत आहेत. ‘बाहुबली २’ या सिनेमामध्ये अभिनेता सुब्बाराजूने साकारलेल्या कुमार वर्माला मराठी अभिनेता गणेश दिवेकरने आवाज दिला आहे. याच गणेशने आता ‘हॅाटेल ट्रॅन्सेल्व्हेनिया ३’ या अॅनिमेशनपटातील ड्रॅक्युलालाही आवाज दिला आहे. राजकुमार हिरानींच्या ‘संजू’ मागोमाग या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘ट्रॅन्सेल्व्हेनिया ३’ या इंग्रजी अॅनिमेशनपटाला आवाज देण्याऱ्या गणेशने ‘मुंबई लाइव्ह’शी संवाद साधला.


अनेक भाषांमध्ये डबिंग

आवाजाच्या दुनियेत गणेश दिवेकर हे फार मोठं नाव मानलं जातं. गणेशने यापूर्वी बऱ्याच भाषांमध्ये डबिंग केलं आहे. यात इंग्रजीचाही समावेष आहे. ‘हिटमॅन्स बॅाडीगार्ड’ या सिनेमात रायन रेनॅाल्ड्स, ‘थॅार’मध्ये स्कुर्गे, तसंच ‘गेम्स आॅफ थ्रोन्स’मध्ये जॅमी लॅनिस्टरसारख्या बऱ्याच हॅालिवूडस्टार्सना गणेशने आवाज दिला आहे.


अॅनिमेशनपटांचाही अनुभव

‘बोल्ट’ या सिनेमामध्ये हॅम्पस्टर नावाच्या घुशीचा (मोठा उंदीर) आवाज काढला आहे. ‘अप’मध्ये अनुपम खेर यांनी आवाज दिलेल्या म्हाताऱ्याच्या जोडीला गणेशने कुत्र्याला आवाज दिला आहे. ‘बालगणेशा’ १ आणि २ मध्ये धोती, टोपी, सूट-बूट घातलेले अशा तीन प्रकारच्या उंदरांना, तर अजय देवगणच्या ‘टुनपूर का सुपरहिरो’मध्ये बकबकासूर, हवालदार अशा एकूण चार कॅरेक्टर्सना आवाज दिला आहे.


आता ‘हॅाटेल ट्रॅन्स्लेव्हेनिया ३’

‘हॅाटेल ट्रॅन्स्लेव्हेनिया’ या गाजलेल्या सिनेमाचा ‘हॅाटेल ट्रॅन्स्लेव्हेनिया ३’ हा तिसरा भाग आहे. या सिनेमातील ड्रॅक्युलाला आवाज देण्याबाबत गणेश म्हणाला की, खरं तर ड्रॅक्युला हे माणसाचं रक्त पितात, पण हा तसा नाही. यांनाही मानवजातीचा नाश करायचा आहे, पण त्यांना ते जमत नाही. या ड्रॅक्युलाचं एक हॅाटेल आहे. या हॅाटेलमध्ये नेहमी नवनवीन पाहुणे येत असतात.


ड्रॅक्युलाची प्रेमकथा

या ड्रॅक्युलाला मेविस नावाची एक मुलगी आहे. आईविना वाढलेल्या या मुलीला आपल्या वडिलांच्या जीवनात पुन्हा एकदा एखादी स्त्री यावी असं वाटत असतं. हे कुटुंब शिपवर व्हेकेशनवर जातात, तेव्हा तिथे ड्रॅक्युलाला एक स्त्री भेटते. त्यानंतर ड्रॅक्युला आणि त्याच्या कुटुंबाचं काय होतं ते या सिनेमात आहे.


चारपैकी एक सिलेक्ट

प्राइम फोकस टेक्नॅालॅाजीमुळे ‘हॅाटेल ट्रॅन्स्लेव्हेनिया ३’ हा सिनेमा मला मिळाला आहे. ड्रॅक्युलासाठी प्रोडक्शन हाऊसला नॅार्मल आवाज नको होता. त्यामुळे त्यांना माझी आठवण झाली. यासाठी चार प्रकारचे आवाज मी काढले. यात साऊथ इंडियन, नॅार्मल, युपीवाला आणि पारसी अॅक्सेंट असलेल्या आवाजांचा समावेष होता. यापैकी एका अॅक्सेंटची निवड ड्रॅक्युलासाठी करण्यात आली.


अॅनिमेटेड कॅरेक्टर्ससाठी आवाज कठीण

वास्तवात प्राणी कधीच बोलत नाहीत. ते केवळ आवाज काढतात, पण अॅनिमेटेड सिनेमांमधील प्राणी माणसांप्रमाणे बोलतात. त्यामुळे माणूस आणि त्या ठराविक प्राण्याचा आवाज मिक्स करून काढण्याचं आव्हान असतं. त्यालाही बोलीभाषेच्या लहेजाचा टच देण्याचं काम करावं लागतं, पण त्यातही एक वेगळीच गंमत असते.


डबसाठी आव्हानात्मक

ओरिजनल अॅनिमेशनपट तयार होताना आधी त्याचे आवाज रेकॅार्ड केले जातात आणि नंतर अॅनिमेशन तयार केलं जातं, पण एखादा अॅनिमेशनपट जेव्हा दुसऱ्या भाषेत डब करायचा असतो तेव्हा कॅरेक्टर्सच्या मुव्हमेंट्स आणि लिप्सिंग मॅच करून डबिंग करण्याचं एक वेगळंच आव्हान असतं.


आगळीवेगळी आवाजांची दुनिया

आवाजांच्या ही दुनिया खऱ्या अर्थाने आगळीवेगळी आहे. इथे मुक्या प्राण्यांनाही आवाज दिला जातोच, पण एखाद्या अन्य भाषेतील सिनेमा पाहणंही सोपं बनवलं जातं. त्यामुळे सिनेमा आणि डबिंग विश्वाचं खूप घट्ट नातं आहे. जगभरातील बड्या बड्या स्टार्सनाही ही दुनिया कधी ना कधी खुणावते आणि ते देखील अॅनिमेशनपटांद्वारे किंवा इतर भाषिक सिनेमांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.



हेही वाचा -

माझ्यापेक्षा विरूद्ध स्वभावाचे घाणेकर साकारणं कठीण- सुबोध भावे

संजयचा वाढदिवस आणि वेबसाइटचा मुहूर्त



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा