Advertisement

TTMM तुझं तू माझं मी - रिव्ह्यू


TTMM तुझं तू माझं मी - रिव्ह्यू
SHARES

या आठवड्यात प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा TTMM 'तुझं तू माझं मी' हा आहे. ललित प्रभाकर आणि नेहा महाजन ही जोडी आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहे. आताच्या पिढीचे लग्नाबाबतचे विचार, स्वतःला हवीहवीशी वाटणारी स्पेस यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. जय, ज्याला फिरायला खूप आवडतं. नवनवीन देशात जाऊन तिथल्या गोष्टी जाणून घेण्यात त्याला जास्त रस आहे. त्याच्या वडिलांचा स्वतंत्र व्यवसाय आहे आणि आता जयनेही लक्ष घालावं, असा त्यांचा आग्रह. राजश्री मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी मुलगी. आपला नवरा राजकुमार नसला तरीही चालेल, पण माझे लाड पुरवणारा हवा या इच्छेवर ठाम असणारी.

जय आणि राजश्री या दोघांच्याही घरी त्यांच्या लग्नाची बोलणी सुरु आहेत. राजश्रीच्या आईला तिच्या लग्नाची खूप घाई आहे. त्यामुळे आलेलं हातचं स्थळ जायला नको, म्हणून ती  राजश्रीच्या मनाविरुद्ध तिचं लग्न ठरवते आणि तिथं त्याचंही लग्न त्याच्या मैत्रिणीबरोबर ठरवलं जात. पण जय आणि राजश्री हे दोघे त्यांच्या लग्नासाठी मानसिकरीत्या तयार नसतात. खूप विचार केल्यानंतर जय त्याच्या लग्नातून आणि राजश्री तिच्या घरातून पळून जायचा निर्णय घेतात आणि घराबाहेर पडतात. घरातून पळून जाताना ते एकाच बसमध्ये चढतात आणि तिथे दोघं पहिल्यांदा एकमेकांसमोर येतात. सुरुवातीला भांडणाने सुरु झालेला हा प्रवास नंतर मैत्रीपर्यंत येऊन पोहचतो. पण काही काळातच  ह्या मैत्रीच्या प्रवासाला  वेगळं ग्रहण लागत आणि त्याचे होणारे वाईट परिणाम थांबवण्यासाठी जय आणि राजश्रीला लग्नाच्या बेडीत अडकावं लागत. पण ज्या परिणामांसाठी त्यांना हे नाटक करावं लागतं त्यापेक्षाही विचित्र गोष्टी घडू लागतात. जय आणि राजश्री दोघांच्याही कुटुंबाापर्यंत त्यांच्या लग्नाची बातमी पोहचते आणि जे लग्न दोघांपुरतं मर्यादित होतं ते त्यांच्या खऱ्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचतं. बरेच दिवस हे नाटक पुढे घेऊन जगणं दोघांनाही अशक्य होतं आणि मग ते सर्व काही घरच्यांना सांगून टाकतात. जय आणि राजश्री एकमेकांपासून वेगळे होतात. दोघांचंही  कुटुंब त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतं. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. काही काळ गेल्यानंतर जय त्याच्या मैत्रिणीशी लग्न करण्यास तयार होतो आणि दुसरीकडे राजश्री ही दुसऱ्या मुलाशी लग्न करण्यास तयार होते. इथे जय आणि राजश्रीची गोष्ट संपणार असं वाटत असतानाच सिनेमा वेगळं वळण घेतो. ते वळण कोणतं ? जयचं लग्न त्याच्या मैत्रिणीशी होतं का ? जय आणि राजश्री एकत्र येतात का ? हे सगळं तर सिनेमा पासूनच तुम्हाला समजेल.

काही ठिकाणी सिनेमा गोंधळून टाकतो. म्हणजे काही सीन समजायला जरा वेळ लागतो. सिनेमात पुष्कराज जयच्या चुलत भावाची भूमिका साकारतो. पण त्याची भूमिका का दाखवली आहे? असाही प्रश्न पडतो किंवा त्याच्या पात्राचा अजून चांगला वापर करता आला असता, असं वाटत राहतं. सिनेमातली सर्व गाणी पहायला आणि ऐकायलाही तितकीच सुंदर आहे. त्यातही 'येना येना'' हे गाणं जास्त चांगलं जमलंय. सिनेमात नेहमीपेक्षा वेगळा बॅकग्राउंड साऊंड ऐकायला मिळतो.

सिनेमात ज्याने जय साकारलाय तो ललित प्रभाकर आणि राजश्री साकारणारी नेहा महाजन ही जोडी एकत्र छान दिसते. दोघांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिलाय. दोघांच्या आईवडिलांच्या भूमिकेत दिसणारे विद्याधर जोशी, सविता प्रभुणे, सतीश पुळेकर, सीमा देशमुख यांनीही त्यांच्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. पण राजश्रीच्या भावाच्या भूमिकेत दिसणारा पुष्कर लोणारकर आणि राजश्रीवर प्रेम करणारा मजनू साकारणारा सागर कारंडे सिनेमात आपली वेगळी छाप सोडून जातात. ललित आणि नेहाची नवी आणि फ्रेश जोडी आणि आजच्या पिढीचं लग्नाबद्दल वाटणारं प्रातिनिधिक मत पडद्यावर पाहण्यासाठी एकदा चित्रपटगृहात जायला हरकत नाही.

संबंधित विषय
Advertisement