'६ गुण'चा ट्रेलर लॉन्च

 Dadar
'६ गुण'चा ट्रेलर लॉन्च

'६ गुण ' ह्या सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्चचा सोहळा काल दिनांक ६ एप्रिल रोजी सिनेमाच्या संपूर्ण टीमसह दादर च्या सूर्यवंशी हॉल येथे पार पडला.

विद्या सर्वदे हा गावातील शाळेत पहिला येणारा मुलगा आहे. त्याचे वडील परदेशात शास्त्रज्ञ आहेत. आईच्या कडक शिस्तीत त्याचा अभ्यास होतो. तो हुशार आहेच. मात्र, जगातील स्पर्धेविषयी अनभिज्ञ आहे. नवीन आलेला हरहुन्नरी राजू त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवून शाळेत पहिला येतो. विद्या राजूची बरोबरी करू शकत नाही. त्यानंतर विद्याला अभ्यासात करावी लागणारी स्पर्धा, त्याच्या पालकांना येणारं दडपण, विद्याची मनोवस्था या सगळ्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. चित्रपटाद्वारे किरण गावडे यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. उज्ज्वला गावडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून, अशोक कोटियन आणि शीला राव सिनेमाचे सहनिर्माते आहेत. शीला राव यांनी याआधी बहुचर्चित "अस्तु" या चित्रपटाची निर्मिती केली होती.

'६ गुण' या चित्रपटात अभिनेता सुनील बर्वे, अभिनेत्री अमृता सुभाष, आर्चित देवधर, अतुल तोडणकर, आरती सोळंकी, प्रणव रावराणे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. चित्रपटात एकूण चार गाणी असून ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी "या, देशाला घडवू या" हे गाणं गायलं आहे. "अभ्यास अभ्यास" या गीताचं गायन आणि संगीत राज पवार यांचं आहे. "कबड्डी कबड्डी" हे गीत राज पवार यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं रवींद्र खोमणे यांनी गायलं आहे. तर "अभ्यास अभ्यास" या गाण्याचं वेस्टर्न व्हर्जन कपिल रेडकर यांनी संगीतबद्ध करून गायलं आहे.

या चित्रपटातून शिक्षण व्यवस्थेवर हसतखेळत भाष्य करण्यात आलं आहे. खेळ, गाणी, नाच अशा माध्यमातून मुलांच्या मनोवस्थेचा वेध घेतला आहे. मुलांना आवडतील अशी गाणी या चित्रपटात आहेत. सर्व पालकांनी हा चित्रपट नक्कीच पहावा. त्यातून त्यांना मुलांच्या जाणीवा आणि अभ्यासाचं दडपण आल्यावर होणारी मानसिक अवस्था याची कल्पना येईल,' असं दिग्दर्शक किरण गावडे यांनी सांगितलं.

Loading Comments