Advertisement

रसिकांना आवडतंय 'डार्लिंग'चं टायटल साँग

टीझर आणि फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र 'डार्लिंग' या आगामी मराठी सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रसिकांना आवडतंय 'डार्लिंग'चं टायटल साँग
SHARES

टीझर आणि फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र 'डार्लिंग' या आगामी मराठी सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 'टकाटक' या सुपरहिट मराठी सिनेमात दमदार भूमिका साकारलेल्या रितिका श्रोत्रीच्या अभिनयानं सजलेल्रा 'डार्लिंग' या आगामी सिनेमाचे वेध आता प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेसृष्टीलाही लागले आहेत. या सिनेमात पुन्हा एकदा तिच्या जोडीला प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून या दोघांसोबत 'लागीरं झालं जी' फेम निखिल चव्हाण प्रमुख भूमिकेत झळकणार असल्यानं हे त्रिकूट रूपेरी पडद्यावर कशा प्रकारे धम्माल करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या सिनेमाचं टायटल साँग रिलीज करण्यात आलं असून, हे गाणं संगीतप्रेमींवर मोहिनी घालण्यात यशस्वी ठरत आहे.

निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांच्या ७ हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार केलेल्या 'डार्लिंग' सिनेमाचं दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं आहे. या सिनेमातील 'डार्लिंग तू माझी डार्लिंग तू...' हे शीर्षक गीत संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. गायक रविंद्र खोमणे यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलेलं हे रोमँटिक साँग गीतकार समीर सामंत आणि महेश ओगळे यांनी लिहिलं असून चिनार-महेश या आजच्या काळातील आघाडीच्या संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलं आहे. सिनेमाच्या कथानकाशी एकरूप होणारं 'डार्लिंग तू माझी डार्लिंग तू...' हे धम्माल गीत रूपेरी पडद्यावरही कमाल करणारं असून, तरूणाईसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करणारं असल्याचं मत चिनार-महेश यांनी व्यक्त केलं आहे.

डार्लिंग' या सिनेमाद्वारे जरी रितिका श्रोत्री आणि प्रथमेश परब ही यशस्वी जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असली तरी निखिल चव्हाणनं साकारलेली व्यक्तिरेखाही महत्त्वाची भूमिका बजावणारी असल्याचं समीर आशा पाटील यांचं म्हणणं आहे. 'डार्लिंग तू माझी डार्लिंग तू...' हे रोमँटिक साँग संगीतप्रेमींना एक नवी अनुभूती देणारं असल्याची आशाही पाटील यांनी व्यक्त केली आहे. सिनेमाच्या टायटलवरून ही प्रेमकथा असल्याचं प्रथमदर्शनीच लक्षात येतं. सिनेमाची कथाही त्यापेक्षा वेगळी नसली तरी पटकथेमध्ये असलेले बरेच उतार-चढाव आणि आजवर कधीही समोर न आलेले प्रेमकथेचे पैलू रसिकांना भावणारे असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेज मिळेल, जे सिनेमागृहातून बाहेर पडेपर्यंत त्यांचं फुल टू मनोरंजन करण्यात यशस्वी होईल. ७ जानेवारी २०२१ ला 'डार्लिंग' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


संबंधित विषय
Advertisement