एकदा तरी चाखावा असा 'मुरांबा'!

  Mumbai
  एकदा तरी चाखावा असा 'मुरांबा'!
  मुंबई  -  

  आपण सगळ्यांनीच आयुष्यात प्रेम केलं असेल. प्रेम म्हटलं, की मग त्यात रुसणं, भांडण, अबोला हे आलंच. पण एवढं सगळं होऊनही एकत्र राहणं म्हणजे प्रेम. अगदी अशीच सुंदर प्रेम कथा आपल्याला मुरांबा या सिनेमात पाहायला मिळते.

  आलोक (अमेय वाघ) आणि इंद्रायणी म्हणजे इंदू (मिथिला पालकर) हे दोघेही लहानपणापासून चौथीपर्यंत एकाच वर्गात शिकलेले. नंतर वाटा बदलतात आणि मग खूप वर्षांनी पुन्हा एकदा त्यांची भेट होते, जेव्हा आलोक एमबीए करत असतो आणि इंदू त्याच कॉलेजमध्ये डिझाइनचा कोर्स करत असते. पुन्हा तीच जुनी मैत्री वाढते. ती मैत्री घट्ट होते आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. त्यानंतर सुरू होते खरी कथा. जसजसं प्रेम जुनं होत जातं, तसं प्रेमात छोट्या छोट्या गोष्टींमुळे खटके उडू लागतात. इंदू इंडिपेंडंट करिअरला खूप महत्व देणारी, कामामध्ये स्वतःला झोकून देणारी आणि याउलट आलोक आहे त्यात समाधानी असलेला. जास्त काळ एका ठिकाणी जॉब न करणारा. अशी ही जोडी, पण तरीही एकमेकांवर तेवढंच जिवापाड प्रेम करणारे.

  आलोक आणि इंदू या दोघांच्याही घरी त्यांच्या प्रेमसंबधाबद्दल सगळं काही माहीत असतं. त्यामुळे आलोकच्या घरी कोणताही कार्यक्रम असला की इंदूला बोलवलं जायचं.

  गेल्या ३ वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. आलोकच्या घरातले पुढच्या २-३ महिन्यात त्यांची एंगेजमेंट करण्याच्या विचारात आहेत आणि एक दिवस आलोक त्याच्या आई बाबांना सांगतो की त्याचं आणि इंदूचं ब्रेकअप झालंय. आणि मग सगळ्या गोष्टींना वेगळं वळण येतं. यावेळी आलोकमध्ये झालेला बदल, त्याच्या आई-बाबांनी त्याला दिलेली साथ, आलोकला आणि इंदूला एकत्र आणण्यासाठी केलेली धडपड, हे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने सिनेमात मांडण्यात आलंय.

  आलोक म्हणजे अमेयने साकारलेलं कॅरेक्टर खूप सुंदर पद्धतीने मांडण्यात आलंय. त्याचे आई-बाबा अर्थात सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित हे प्रत्येकाला आपल्या आई बाबांची आठवण करून देतील, एवढे आपले वाटतात. मिथिलाचा हा पहिला सिनेमा ती खूप वेळ सिनेमात दिसली नाहीये, पण तिने साकारलेली इंदू ही आवडून जाते. या सिनेमात हेच कलाकार असायला हवेत एवढे ते कॅरेक्टर परफेक्ट वाटतात.

  आई मुलाचं, वडिलांचं आणि मुलाचं नातं कसं असायला हवं, याचं खूप सुंदर चित्रण सिनेमात पाहायला मिळतं.

  आपण जिच्यावर प्रेम करतो, ती लांब गेली की होणारी तळमळ, तीची भासणारी गरज, एवढं असूनही पुरुषी अहंकार आड आला की नात्याचं काय होतं हे विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे.

  सिनेमातली सर्वच गाणी अप्रतिम आहेत. दिग्दर्शकाने कोणत्याच गोष्टीचा अतिरेक केलेला नाही. जिथे जेवढं हवं, तेवढंच दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सिनेमात खूप ठिकाणं दिसत नाहीत. सरळ साधी मांडणी आहे. आपण आजूबाजूला पाहिलेलीच ही प्रेम कथा आहे. पण तरीही ती आवडते. कुठेच 'हे असं का केलं ? किंवा या जागी असं झालं असतं तर अजून चांगलं झालं असंत' हे सिनेमात कुठेच जाणवत नाही. सिनेमा संपल्यावरही त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर लक्षात राहतं.

  आलोक आणि इंदूचं ब्रेकअप का होतं? त्यातून त्याचे बाबा त्यांना एकत्र आणण्यासाठी काय प्रयत्न करतात? आणि एवढं सगळं करून ते दोघे एकत्र येतात का? ते हा सिनेमा पाहिल्यावर समजेल.

  नात्यात येणाऱ्या आंबट-गोड क्षणांची आठवत करून देणारा आणि प्रत्येकाला आपलासा वाटायला लावणारा वरुण नार्वेकर दिग्दर्शित हा 'मुरांबा' एकदा तरी चाखाच.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.