Advertisement

'सारेगमप'चा विजेता नचिकेत लेलेला मिळालेली 'ही' सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट!

एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर मला त्यांचा कॉल आला होता. ते म्हणजे की, तुझं गाणं ऐकल्यानंतर मला बाबांची आठवण झाली. या पेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट माझ्या आयुष्यात असूच शकत नाही!

'सारेगमप'चा विजेता नचिकेत लेलेला मिळालेली 'ही' सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट!
SHARES
Advertisement

मराठी 'सारेगमप'चा रविवारी महाअंतिम सोहळा पार पडला. अवघ्या महाराष्ट्राला ज्याची उत्सुकता होती, तो निकाल जाहीर झाला आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. इतर पंगेखोरांशी काँटे की टक्कर देतकल्याणच्या नचिकेत लेलेने बाजी मारली आणि 'सारेगमप'च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. विजेतेपदानंतर नचिकेतने 'मुंबई लाइव्ह'शी मारलेल्या मनमोकळ्या गप्पांचा हा सारांश... सलग १० तास लाईव्ह आणि अंतिम फेरीचा अनुभव कसा होता?

सलग १० तास परफॉर्म करायचं आहे हे कळल्यावर भिती, उत्सुकता अशा अनेक भावना एकाच वेळी निर्माण झाल्या. थोडंसं टेन्शनही होतंच. या आधी अशा प्रकारे कधीच परफॉर्म केल नव्हतं. मैदानात तर उतरलो होतो. आता फक्त सिक्सर मारायचा एवढंच डोक्यात होतं. गेले ३ ते ४ दिवस आम्ही बाराही जण सतत रियाज करत होतो. कारण आम्हाला प्रत्येकाला जवळजवळ १० गाणी गायची होती. त्यामुळे थोडं दडपण निश्चित होतं.


 आतापर्यंत तुला मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती?

मी पहिल्याच एपिसोडला 'देवा घरचे ज्ञात कोणाला' हे गाणं गायलं होतं. हे गाणं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आहे. तो एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर मला पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र शौनक अभिषेकी यांचा कॉल आला होता. शौनकजी म्हणजे की, तुझं गाणं ऐकल्यानंतर मला बाबांची आठवण झाली. या पेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट माझ्या आयुष्यात असूच शकत नाही.
 या विजेतेपदाचं श्रेय कोणाला देशील?

केवळ सारेगमपच नाही, तर आज मी जो काही आहे तो फक्त माझ्या आई-बाबांमुळेच! त्यामुळे माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय माझ्या आईबाबांना जातं. मला आई-बाबांनी कधीच 'केवळ अभ्यास कर' असं म्हटलं नाही. 'अमुक टक्के मिळालेच पाहिजेत', असं कसलंच बंधन माझ्यावर कधीच नव्हतं. मी करिअर म्हणून गाणं निवडण्यामागे आई-बाबांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता.


 'झी मराठी'साठी शिर्षक गीत गाण्याची संधी तुला मिळणार आहे...

'झी मराठी'सारख्या नामांकित वाहिनीसाठी मला शिर्षक गीत गाता येणार आहे. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी स्वत:ला यासाठी मानसिकरित्या खूप तयार केलं आहे. शिर्षक गीत म्हटल्यावर हजारो घरांमध्ये ते दररोज वाजणार आहे. हजारो लोक ते ऐकणार आहेत. त्यामुळे ते चांगलं झालंच पाहिजे. एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. रसिक प्रेक्षकांचं असंच प्रेम जर माझ्या पाठिशी असेल, तर नक्कीच माझं शिर्षक गीत चांगलं होईल, अशी मला अशा आहे.
 'सारेगमप'मध्ये सगळ्यात जास्त आठवण कोणाची येईल?

हे पर्व संपल्याचं अतिशय वाईट वाटतंय. माझ्या बरोबरच्या इतर स्पर्धकांना मी खूप जास्त मिस करेन. कारण, इतके दिवस एकत्र केलेली मजा, रियाज, एकमेकांना दिलेला सपोर्ट कायम आठवेल. सगळ्यात जास्त मला कमलेश भडकमकर याची खूप आठवण येईल. संगीताबरोबरच मॉरल सपोर्ट कायमच कमलेश दादाने आम्हाला दिला. कमलेश दादामुळेच माझं महाअंतिम फेरीचं टेन्शन कमी झालं.


 तुझ्या पुढील प्रवासाबदद्ल काय सांगशील?

'सारेगमप'चं विजेतेपद ही तर यशाची पहिली पायरी आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आत्ता कुठे माझी सुरूवात झाली आहे. अजून खूप गाणी लोकांना एेकवायची आहेत. खूप मेहनत घ्यायची आहे. 'सारेगमप'मुळे माझ्या कामाला योग्य दिशा मिळाली आहे. आता फक्त रियाज आणि काम करायचं आहे.


संबंधित विषय
Advertisement