म्हणून इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार


SHARE

गुरुवारी संध्याकाळी होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वितरण सोहळ्यावर अनिश्चिततेचं सावट पसरलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. पण इराणींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यास विजेत्यांनी नकार दिला आहे. कारण राष्ट्रपतींच्या हस्तेच हा पुरस्कार मिळायला हवा, अशी कलाकारांची मागणी आहे. जरी इराणी यांनी हा पुरस्कार दिला तर त्यावर बहिष्कार टाकू, असा बेधडक पवित्रा कलाकारांनी घेतला आहे.


कलाकारांचा विरोध

नवी दिल्लीतील विज्ञान भवनात ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. मात्र यातील काही पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि काही पुरस्कार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. याआधी केवळ राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जात होते. मात्र यावर्षी स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार असल्यानं कलाकरांनी विरोध केला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला अवघे काही तास राहिले असताना कलाकारांच्या विरोधामुळे केंद्र सरकार अडचणीत सापडलं आहे.


म्हणून स्मृती इराणी देणार पुरस्कार

राष्ट्रपतींना त्यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे पुरस्कार सोहळा संपेपर्यंत थांबता येणार नाही. त्यामुळे ते केवळ ११ विजेत्यांना पुरस्कार देणार आहेत. त्यानंतर बाकीचे पुरस्कार स्मृती इराणी यांच्या हस्ते देण्यात येतील. मात्र हे कोणते ११ पुरस्कार असतील ही नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली अाहेत. 

चित्रपटाचे पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्तेच दिले जातात, हा इतिहास आहे. तो असा अचानक कसा बदलू शकतो? जर स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार असेल तर अाम्ही त्यावर बहिष्कार घालू. आम्ही आमचा निर्णय केंद्र सरकारपर्यंत पोहचवला आहे. त्यांच्या निर्णयाची अाम्ही वाट बघत आहोत.
प्रसाद ओक, दिग्दर्शक, चित्रपट कच्चा लिंबू

संबंधित विषय
ताज्या बातम्या