Advertisement

‘बापजन्म’मध्ये निपुणच्या नैपुण्याचा कस


‘बापजन्म’मध्ये निपुणच्या नैपुण्याचा कस
SHARES

हिंदीत आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान यांचे चित्रपट प्रदर्शनाच्या तारखांमुळे चर्चेत राहतात हे खरं असलं तरी, याबाबतीत मराठी चित्रपटही मागे नाही. ‘बापजन्म’ने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. ‘बापजन्म’ हे निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित नव्या चित्रपटाचं शीर्षक आहे. या चित्रपटाची घोषणा नुकतीच संजय छाब्रिया आणि सुमतीलाल शाह यांनी केली. चित्रपटाच्या घोषणेबरोबरच चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करत ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ आणि ‘सिक्स्टीन बाय फोर प्रॉडक्शन’ने बाजी मारली आहे. येत्या 15 सप्टेंबरला हा चित्रपट राज्यभरातल्या चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. ‘बापजन्म’चं दिग्दर्शन निपुण करणार आहे, हे ठरलं असलं तरीही यातले कलाकार, तंत्रज्ञ अद्याप ठरायचे आहेत.

सृजनशील युवा पिढीचा प्रतिनिधी म्हणून स्वतःची चमक दाखवणा-या लेखक, दिग्दर्शक, कलावंत निपुण धर्माधिकारीने चित्रपटरसिकांच्या स्वतःबद्दलच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. ‘मराठी कास्टिंग काऊच’ या युवावर्गात कमालीच्या लोकप्रिय ठरलेल्या वेब सिरीजमुळे निपुण ख-या अर्थाने घराघरात पोहोचला. निपुणने सुरु केलेल्या ‘नाटक कंपनी’ या संस्थेने शतकभरातील उत्तमोत्तम संगीत नाटकं मराठी रंगभूमीवर पुनरुज्जीवित स्वरुपात आणली. विल्यम शेक्सपियरच्या नाट्यपरंपरेलासुद्धा त्याने या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे प्रयत्न यशस्वी ठरल्याची दाद अमेरिका तसंच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवात रसिकप्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली. निपुणचं लेखन-दिग्दर्शन असलेलं ‘अमर फोटो स्टुडियो’ हे नाटक सध्या रंगभूमीवर धम्माल उडवतंय. दुसरीकडे ‘बापजन्म’चे प्रस्तुतकर्ता एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटनेही मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, हापूस, आजचा दिवस माझा, मुंबई-पुणे-मुंबई 2, टाईमप्लीज सारखे चर्चित आणि यशस्वी चित्रपट देत चित्रपटसृष्टीत दबदबा निर्माण केला आहे.
प्रस्तुतकर्ता आणि दिग्दर्शकाची युती चित्रपटाबद्दल रसिकांची उत्कंठी वाढवेल, हे खरंच. उत्तम कथानक, अभिनय, संगीत, निर्मितीमूल्य आदींबरोबर तिकिटखिडकीवर यश मिळवणं, या आव्हानांचा सामना करत निपुणला स्वतःचं नैपुण्य ‘बापजन्म’तून दाखवण्याची संधी मिळणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा