Advertisement

आई-मुलीच्या नात्याची मधुर कथा

या चित्रपटाची कथा आहे माधुरी प्रधान (सोनाली कुलकर्णी) या चाळीशीतील स्त्रीची. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यात पळत असताना पोलिस तिला पकडतात. पोलिस ठाण्यात आल्यावर ती आपण २० वर्षांची असल्याचं सांगते. शोध घेतल्यावर साताऱ्यातील काव्या (संहिता जोशी) नावाच्या मुलीने आपली आई हरवल्याची तक्रार केल्याचं पोलिसांना समजतं.

आई-मुलीच्या नात्याची मधुर कथा
SHARES

काही चित्रपट शीर्षकावरूनच आपला आशय स्पष्ट करतात, पण काही मात्र शीर्षकापेक्षा खूप भिन्न विषय पडद्यावर मांडतात. 'माधुरी' हा चित्रपट दुसऱ्या पठडीत मोडणारा आहे. शीर्षकावरून या चित्रपटात नेमकं काय दडलंय याचा अंदाज बांधता येत नाही. चित्रपट पाहिल्यावर हा आई-मुलीच्या नात्यावर आधारित असल्याचं जाणवतं. दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी एका वेगळ्या नजरेतृन आई-मुलीच्या नात्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

आई-मुलीच्या नात्यातील भावबंध दाखवणारे बरेच चित्रपट यापूर्वी आले असले तरी कथेच्या विशिष्ट मांडणीमुळे हा चित्रपट वेगळा ठरतो. विषय जुनाच असला तरी तो काहीशा वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे. कोणतीही आई आपल्या मुलीसाठी चांगलाच विचार करत असते, पण दोन पिढ्यांच्या विचारसरणीतील फरकामुळे मुलं आई किंवा वडिलांना समजून घेत नसतात. ही परिस्थिती सर्वच घरांमध्ये असते. अशातच जर एखाद्या मुलीला आपल्या आईची स्वत:च्या मुलीसारखी काळजी घ्यावी लागली तर या नात्यामधील गुंता कसा सुटू शकतो त्याचं चित्रण स्वप्ना यांनी या चित्रपटात केलं आहे.

या चित्रपटाची कथा आहे माधुरी प्रधान (सोनाली कुलकर्णी) या चाळीशीतील स्त्रीची. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यात पळत असताना पोलिस तिला पकडतात. पोलिस ठाण्यात आल्यावर ती आपण २० वर्षांची असल्याचं सांगते. शोध घेतल्यावर साताऱ्यातील काव्या (संहिता जोशी) नावाच्या मुलीने आपली आई हरवल्याची तक्रार केल्याचं पोलिसांना समजतं. माधुरी ही काव्याचीच आई असते. पोलिस माधुरीला काव्याच्या स्वाधीन करतात आणि मग टप्प्याटप्प्याने कथेमधील रहस्य उलगडत जातं. 


मानसोपचार तज्ज्ञ डॅा. तुषार पाणिग्रही (शरद केळकर) माधुरीवर उपचार करण्यासाठी येतात, तेव्हा तिला रेट्रोग्रेड अॅमनेझिया हा आजार झाल्याचं समजतं. या फेजमध्ये पेशंट आपल्या आयुष्यातील ठराविक वर्षांचा काळ विसरतो. माधुरीवर उपचार सुरू करण्यापूर्वी डॅाक्टर तुषार पूर्वी घडलेल्या सर्व घटनांची माहिती काव्याकडून घेतात. या दरम्यान फ्लॅशबॅकमध्ये चित्रपटाची कथा उलगडत जाते.

या विषयावर यापूर्वी बरेच चित्रपट आलेले आहेत. त्यामुळे विषयात नावीन्य नसलं तरी स्वप्ना यांनी ज्याप्रकारे कथानक १८० डिग्रीमध्ये फिरवून आईला मुलीच्या जागी आणि मुलीला आईच्या जागी उभं करून या नात्यातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला ते नावीन्यपूर्ण आहे. चित्रपट सुरू झाल्यानंतर कथानक वेगात पुढे सरकतं, पण काही ठराविक अंतराने थबकतं. त्यामुळे उत्सुकता मावळते. मध्यंतरापूर्वीच्या भागापेक्षा नंतरचा भाग जास्त उत्कंठावर्धक झाल्याने उस्तुकता वाढते. मध्यंतरापूर्वीच्या भागात केवळ मागची कहाणी ऐकावी लागते. यात फारसा रोमांच नसल्याने थोडा कंटाळाही येतो. मध्यंतरानंतर जेव्हा कथा वर्तमान काळात धावू लागते, तेव्हा बऱ्याच रहस्यांवरून पडदा उठतो.

यापूर्वीच्या चित्रपटांप्रमाणेच स्वप्ना यांनी या चित्रपटामध्येही एक वेगळा प्रयत्न केला असला तरी तो तितकासा पुरेसा ठरलेला नाही. चित्रपटातील संवाद डोळ्यात अंजन घालणारे असले तरी पटकथेची बांधणी आणखी घट्ट हवी होती. शरद केळकरच्या वाट्याला आलेले काही संवाद बरंच काही सांगणारे आहेत. चित्रपटात बऱ्याच ठिकाणी मालिकांसारखं एकच घर पुन: पुन्हा दाखवण्याचा मोह टाळण्याची गरज होती. चित्रपटातील काही गाण्यांचे बोल सहज ओठांवर रुळणारे नसले तरी संगीताचा साज मनात भरून राहणारा आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट उजवा आहे.

सोनाली कुलकर्णीने पुन्हा एकदा शीर्षक भूमिकेतील व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारली आहे. काही ठिकाणी तिच्या वाढत्या वयाची जाणीव होते, पण ही भूमिका चाळीशीतील स्त्रीची असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य ठरतं. पदार्पणातील भूमिकेत संहिता जोशीने चांगला प्रयत्न केला असला तरी अभिनयासोबतच संवादफेकीवर तिला आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. तिच्या वाट्याला आलेली काही दृश्ये अभिनयाचा कस लावणारी होती, पण तिथे ती थोडी कमी पडल्यासारखी वाटली. 

शरद केळकरने डॅाक्टरची भूमिका यशस्वीपणे साकारली आहे. त्याच्या वाट्याला आलेले काही संवाद समर्पक आणि अर्थपूर्ण आहेत. यासोबत रोहन उर्फ गुगलच्या भूमिकेत अक्षय केळकर लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे. मृणाल कुलकर्णींचा मुलगा विराजसने साकारलेली काहीशी ग्रे शेडेड भूमिकाही छान झाली आहे.

थोडक्यात काय तर आई-मुलीच्या नात्यावर आधारित असलेली ही गोष्ट बरंच काही सांगत आपल्यात बदल घडवण्यास भाग पाडणारी आहे. कथानकाची वेगळ्या प्रकारची मांडणी आणि कलाकारांचा अभिनय या जमेच्या बाजू असलेल्या आई-मुलीच्या नात्याच्या या मधुर कथेसाठी एक चान्स घ्यायला हरकत नाही.मराठी चित्रपट : माधुरी

निर्माते -  मोहसीन अख्तर

दिग्दर्शिका - स्वप्ना वाघमारे जोशी

कथा - शिरीष लाटकर, समीर अरोरा, स्वप्ना वाघमारे जोशी

पटकथा - शिरीष लाटकर, समीर अरोरा

कलाकार - सोनाली कुलकर्णी, संहिता जोशी, शरद केळकर, अक्षय केळकर, विराजस कुलकर्णी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा