Advertisement

आळंदीच्या चैतन्य देवढेचं ‘लकी’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण!

मूळचा आळंदीचा असलेला चैतन्य देवढे हा बालगायक सूरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ या आगामी मराठी सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे.

आळंदीच्या चैतन्य देवढेचं ‘लकी’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण!
SHARES

निर्माता-दिर्ग्दशक-डीओपी अशी ओळख असलेल्या संजय जाधवने नवोदितांना ब्रेक देण्याचा आपला वारसा पुन्हा एकदा जपला आहे. ‘दुनियादारी’ या गाजलेल्या सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता ‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजयने मराठी सिनेसृष्टीत ब्रेक दिला आहे.


पार्श्वगायनाची संधी

मूळचा आळंदीचा असलेला चैतन्य देवढे हा बालगायक सूरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ या आगामी मराठी सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. संजयच्या ‘दुनियादारी’ सिनेमासाठी संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिलेल्या ‘यारा यारा फ्रेंडशीपचा खेळ सारा...’ या गाण्यात त्यावेळी रिएलिटी शो करणाऱ्या रोहितल राऊतला गाण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा एकदा संजयने चैतन्य नावाच्या आणखी एका गुणी गायकाला पार्श्वगायनाची संधी दिली आहे.


चैतन्य देवढे ‘लकी’बॉय

‘संगीत सम्राट’, ‘राइझिंग स्टार’ आणि यंदा ‘सूर नवा ध्यास नवा’ अशा रिएलिटी शोमधून दिसलेला आळंदीचा चैतन्य देवढे ‘लकी’बॉय ठरला आहे. चैतन्यच्या निवडी विषयी संजय जाधव म्हणाला, या गाण्याच्या सिच्युएशनसाठी आम्हाला एका लहान मुलाचा आवाज हवा होता. वैभव चिंचाळकरने मला चैतन्यचं नाव सुचवलं. चैतन्यला आवाजाचं दैवी वरदान लाभलं आहे. त्याच्यातली निरागसता मला खूप भावल्याने त्याची निवड केली. 

संगीतकार पंकज पडघन म्हणाले, नव्या प्रतिभेसोबत काम करायला मला आणि संजयदादांना नेहमीच आवडतं. चैतन्यची आकलनक्षमता खूप चांगली आहे. त्याने एकाच दिवसात या गाण्याचा रियाज करून गाण्याचं रेकॉर्डिंगही केलं. त्याचं मला खूप कौतुक वाटतं.


काय म्हणाला चैतन्य?

आपल्या पहिल्या वहिल्या ब्रेकबाबत चैतन्य म्हणाला, मी स्वत:ला खूप ‘लकी’ समजतो, की सिनेसृष्टीतल्या अशा दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पंकज पडघन यांनी संगीतबध्द केलेली गाणी ऐकली होती. संजयदादांचे सिनेमे पाहिले होते, पण या दोन दिग्गजांना प्रत्यक्ष भेटायची आणि त्यांच्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यावर ज्ञानेश्वर माऊलींचीच कृपा असल्याचं मी मानतो.

 

यांच्या मुख्य भूमिका

बी लाइव्ह प्रॉडक्शन्स आणि ड्रिमींग ट्वेंटीफोर सेव्हनची निर्मिती असलेल्या ‘लकी’मध्ये अभय महाजन आणि दिप्ती सती मुख्य भूमिकेत आहेत. याखेरीज उमेश कामत, अमेय वाघ, सई ताम्हणकर, सोनाली खरे, तेजस्विनी पंडीत, शुभांगी बुगडे, सिद्धार्थ जाधव यांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. ७ डिसेंबरला हा सिनेमा महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा