Advertisement

पुलं नंतर बाबासाहेब साकारणं हा दुग्धर्शकरा योग : सागर देशमुख

मोठ्या पडद्यावर पुलं साकारल्यानंतर छोट्या पडद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारण्याची आव्हान काही वेगळंच असल्याचं सागरचं म्हणणं आहे. याविषयी तो म्हणाला की, खरतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावर मालिका येणं आणि त्यात महामानवाची भूमिका साकारण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे.

पुलं नंतर बाबासाहेब साकारणं हा दुग्धर्शकरा योग : सागर देशमुख
SHARES

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'भाई - व्यक्ती की वल्ली' या चित्रपटात महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपात भेटणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर १८ मे म्हणजेच बुद्धपौर्णिमेपासून सुरु होणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत सागर बाबासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत आहे. 


दुग्धशर्करा योग

मोठ्या पडद्यावर पुलं साकारल्यानंतर छोट्या पडद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारण्याची आव्हान काही वेगळंच असल्याचं सागरचं म्हणणं आहे. याविषयी तो म्हणाला की, खरतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावर मालिका येणं आणि त्यात महामानवाची भूमिका साकारण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी या भूमिकेसाठी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चरित्रात्मक भूमिका साकारायला मिळणार याचा आनंद तर आहेच, पण आंबेडकर साकारणं ही खूप मोठी जबाबदारी असल्याचं मला वाटतं. या भूमिकेच्या निमित्त्ताने मी अभिनेता म्हणून नक्कीच श्रीमंत होईन.

 

स्वप्नातही वाटलं नव्हतं

पुलंसारखी सदाबहार व्यक्तिरेखा यशस्वीपणं साकारल्यानंतर दलितांचा कैवारी असलेल्या बाबासाहेबांच्या भूमिकेची तयारी करणं हे सागरसाठी वेगळं आव्हान होतं. या संदर्भात बोलताना सागर म्हणाला की, मी आय. एल. एस. लॉ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. भारतीय संविधानाचा तेव्हा केलेला अभ्यास आता बाबासाहेबांची भूमिका साकारताना कामी येतो आहे. 'दि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया' असा एक पेपर लॉ शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावा लागतो. भारताची राज्यघटना लिहिणं किती कठीण आहे हे पेपर लिहिताना नेहमी वाटायचं. तेव्हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असणाऱ्या बाबासाहेबांची भूमिका साकारायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. 


सेटवरही पुस्तकांचं वाचन 

बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी तयारी करताना सागरला त्यांच्या अगाध विचारसरणीचीही जाणीव झाली आहे. तो म्हणाला की, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक अशा सर्वच स्तरांवर बाबासाहेबांचे विचार आणि कर्तृत्व खूप व्यापक आहे. महामानवाचं हे कार्य समजून घेण्यासाठी मी बरीच पुस्तकं वाचत आहे. धनंजय कीर लिखीत बाबासाहेबांचं चरित्रसुद्धा वाचलं. सुखदेव थोरात यांनी बाबासाहेबांवर दिलेली व्याख्यानं पाहिली. सेटवरही फावल्या वेळात मी या पुस्तकांचं वाचन करत असतो. माझ्यातल्या अभिनेत्याच्या वाढीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेणं सोपं काम नाही. जातीव्यवस्थेचं उच्चाटन करुन जगाला समानतेचा संदेश देण्याचा आंबेडकरांचा विचार माझ्या मनात खोलवर रुजला आहे. त्यांची वाचनाची आवड मी आत्मसात करतो आहे.

 

चित्रमय स्वगत

मोठ्या पडद्यावर पुलंचा लुक यशस्वीपणं सादर केल्यानंतर बाबासाहेबांच्या लुकसाठी घ्याव्या लागलेल्या मेहनतीबद्दल सागर म्हणाला की, बाबासाहेबांच्या लुकसाठी त्यांच्यावर आधारित असलेल्या 'चित्रमय स्वगत' या पुस्तकाचा खूप फायदा झाला. या पुस्तकातील फोटोंचा आधार घेऊन मला त्यांच्यासारखा लुक देण्यात आला आहे. यु ट्यूबवर आंबेडकरांच्या संदर्भातील लेक्चर्स उपलब्ध आहेत ती सुद्धा आम्ही पहात असतो. मेकअप आर्टिस्ट विशाल पाठारे या लूकसाठी विशेष मेहनत घेत आहेत.

 

महामानवापर्यंतचा प्रवास

बाबासाहेबांवरील पहिली मालिका असलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर'च्या वेगळेपणाबाबत विचारलं असता सागर म्हणाला की, बाबासाहेबांचं जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जाणार आहे. बाबासाहेबांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचं कार्य आजही तेवढंच परिणामकारक आणि स्फूर्तीदायी ठरतं. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने या मालिकेची निर्मिती केली आहे. बाबासाहेबांचा बालपण ते महामानवापर्यंतचा प्रवास या मालिकेत आहे.



हेही वाचा -

रवी जाधवच्या 'रंपाट'चं संगीत प्रकाशन

रिंकू-शुभंकरचं रोमँटिक गाणं पाहिलं का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा