Advertisement

रवी जाधवच्या 'रंपाट'चं संगीत प्रकाशन

सोलापूरचा मिथुन आणि कोल्हापूरची मुन्नी असेच फटाफट यश मिळवून झटपट स्टार बनून रग्गड पैसा कमवून आपापल्या आईवडिलांच्या इच्छा आकांशा पूर्ण करायचे स्वप्न घेऊन मुंबईला येतात व त्यानंतर सुरु होतो स्वप्नांच्या वाटेवरचा संगीतमय गंमतीदार प्रवास.

रवी जाधवच्या 'रंपाट'चं संगीत प्रकाशन
SHARES

'नटरंग'पासून आजपर्यंत नेहमीच कधीही समोर न आलेल्या विषयांवर चित्रपट बनवणारा दिग्दर्शक रवी जाधव आता 'रंपाट' नावाचा एक रोमँटिक मसालापट घेऊन येत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसमवेत 'रंपाट'चा संगीत प्रकाशन सोहळा पार पडला.


फर्स्ट लुकला प्रतिसाद 

रवी मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून 'रंपाट'मधील एक एक कॅरेक्टर रिव्हील करत आहे. यापैकी मुख्य भूमिकेत असलेला मिथुन म्हणजेच अभिनय बेर्डे आणि मुन्नी म्हणजे काश्मिरा परदेशी यांच्या फर्स्ट लुकला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. याखेरीज संगीत प्रकाशन सोहळ्यापूर्वीच रसिकांच्या भेटीला आलेली यातील गाणीही रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. रसिकांच्या या प्रतिसादानंतर 'रंपाट'चं अधिकृत संगीत प्रकाशन करण्यात आलं आहे.


१७ मे रोजी प्रदर्शित

हल्लीच्या तरुण पिढीला स्टारडमच्या स्वप्नांनी झपाटून टाकलं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मंडळी एकाच दिशेकडं धाव घेतात ती दिशा म्हणजे मुंबई. 'रंपाट'मधले मिथुन आणि मुन्नीसुद्धा याच स्वप्नाचा पाठलाग करत आहेत. त्यांच्या याच प्रवासाची मनोरंजक कथा म्हणजेच 'रंपाट' हा चित्रपट. झी स्टुडिओज् प्रस्तुत 'रंपाट' १७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


आयच्यान रं

'रंपाट'मध्ये चिनार-महेश या संगीतकार दुकलीच्या संगीतानं सजलेली चार गाणी आहेत. सध्या सोशल नेटवर्कवर 'आयच्यान रं...' हे गाणं गाजत आहे. मराठी चित्रपटात रॅप गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील गाणी गुरु ठाकूर, मंगेश कांगणे, ए-जीत, जे सुबोध, जॅझी नानू, एक्सबॉय आणि रवी जाधव यांनी शब्दबद्ध केली आहेत, तर बेला शेंडे, रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, ए-जीत, जे सुबोध, जॅझी नानू, एक्सबॉय आणि किलर रॉक्स (बिटबॉक्सर)यांच्या सोबतीनं सौरभ साळुंखे यांनी स्वरबद्ध केली आहेत.


 संगीतमय गंमतीदार प्रवास

आयुष्यात काही जण संधी मिळण्याची वाट पाहत राहतात, तर काही संधीपर्यंत स्वत:च चालत जातात. रंपाट ही अशाच दोघांची म्हणजेच मिथुन आणि मुन्नीची गोष्ट आहे. सोलापूरचा मिथुन आणि कोल्हापूरची मुन्नी असेच फटाफट यश मिळवून झटपट स्टार बनून रग्गड पैसा कमवून आपापल्या आईवडिलांच्या इच्छा आकांशा पूर्ण करायचे स्वप्न घेऊन मुंबईला येतात व त्यानंतर सुरु होतो स्वप्नांच्या वाटेवरचा संगीतमय गंमतीदार प्रवास. 


 मिथुन आणि मुन्नीचं भावविश्व

कथा, पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित, रवी जाधव यांचे आहेत. या चित्रपटात प्रिया बेर्डे, अभिजीत चव्हाण आणि कुशल बद्रिके यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून वैभव मांगले, आनंद इंगळे, चंद्रकांत कुलकर्णी, अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर पाहुणे कलाकार आहेत. वासुदेव राणे यांनी छायाचित्रणातून मिथुन आणि मुन्नीचं भावविश्व 'रंपाट'मध्ये चितारलं आहे. संकलन अभिजित देशपांडे यांनी केलं असून, वेशभूषा मेघना जाधव यांची आहे.



हेही वाचा -

श्रद्धा कर्जतमध्ये करतेय 'साहो'चं शूटिंग

जॅान-अर्शदचा 'पागलपंती'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा