Advertisement

'समांतर २'चा ट्रेलर प्रदर्शित, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

समांतर 2 चा ट्रेलर रिलीज झाला असून याची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे.

'समांतर २'चा ट्रेलर प्रदर्शित, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

‘समांतर’ वेब सीरिजच्या पहिल्या सीझनच्या अभूतपूर्व यशानंतर वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिली आहे. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता शमली आहे. कारण 'समांतर 2'चा ट्रेलर रिलीज झाला असून याची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे.

१ जुलै रोजी समांतरचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यंदाच्या पर्वात अभिनेत्री सई ताम्हणकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आसुसले आहेत. त्यातच निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनमध्ये बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचं सांगितलं आहे.

सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज आहेत. स्वप्निल जोशीची कुमार महाजनची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सीरिज बेतली आहे.

यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जगून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेवू लागतो. यात एक नवीन स्त्री कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचं भाकीत आहे.

त्यानंतर कुमारचा नशिबाचा शोध सुरू होतो. या डायरीचा अंदाज रोखण्यासाठी कुमारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु असतानाही त्या स्त्रीचा कुमारच्या आयुष्यात प्रवेश होतो. ही स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीनं आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला नाशिबाचा सामना करावा लागणार का? याचा शोध या पर्वात घेतला जाणार आहे.

ही १० भागांची सीरिज आहे. मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा