Advertisement

भन्साळींवरील हल्ला अत्यंत हिणकस : सोनम कपूर


भन्साळींवरील हल्ला अत्यंत हिणकस : सोनम कपूर
SHARES

मुंबई - प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावरील हल्ल्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंतांनी निषेध केला आहे. पद्मावती चित्रपटाच्या सेटवर भन्साळी यांच्याबद्दल जो काही हल्ल्याचा प्रकार घडला, तो अत्यंत हिणकस असून, त्याचा मी निषेध करते, अशा शब्दांमध्ये सोनम कपूरने आपली भावना व्यक्त केली आहे. करण जोहर, अनुराग कश्यप, प्रियांका चोप्रा, विक्रम भट, कबीर खान या मान्यवरांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान हल्ल्याच्या प्रकारामुळे व्यथित झालेल्या संजय लीला भन्साळी यांनी चित्रीकरण रद्द केले असून ते मुंबईला परतले आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट या हल्ल्याबद्दल म्हणाले, आम्ही फिल्ममेकर मंडळी कायम काचेच्या घरात राहत असतो. आमच्या सुरक्षिततेविषयी कोणी काहीच करत नाही. अर्थात या प्रश्नाचे उत्तर मलाही माहीत नाही. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने भन्साळी यांच्यावरील हल्ल्यामुळे आपण व्यथित झाल्याची प्रतिक्रिया दिली. प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान म्हणाले, की काही लोकांनी यापूर्वी आमच्या नवीन चित्रपटांचे प्रदर्शन रोखण्याचा प्रयत्न केला. आता तर आम्हांला आमचे चित्रपट बनवण्यापासून रोखले जात आहे. पद्मावतीच्या सेटवर जे काही घडलेय ते पाहता हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व मंडळींनी आता एकत्र येण्याची गरज आहे. अशा प्रकारचे हल्ले करणाऱ्या मूर्ख लोकांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, असे मत दिग्दर्शक करण जोहर यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अनुराग कश्यपने हिंदी चित्रपटसृष्टीने झालेली दुर्घटना लक्षात घेऊन आता एकदा तरी एकत्र येऊन आवाज उठवायला हवा असे मत व्यक्त केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा