शेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेमाचा नायक


SHARE

कुणाचं नशीब कधी कुणाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. काहींना जिथे पूर्ण आयुष्य खर्ची घालवूनही एक भूमिका साकारण्याची संधी मिळत नाही, तिथे काहींना मात्र ही संधी न मागता मिळते. जळगावच्या शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या सुदर्शन पाटीलकडे अशीच एक संधी चालून आली आणि तो थेट सिनेमाचा नायक बनला...


अनपेक्षितपणे सिनेमाकडे 

जळगावमधील खेडेगावातील एक मुलगा साईबाबांच्या वास्तव्यामुळे पवित्र झालेल्या शिर्डीमध्ये एकीकडे शिक्षण तर दुसरीकडे कसरती करत असतो. एका पारखी दिग्दर्शकाची नजर त्याच्यावर पडते आणि तो थेट सिनेमाचा नायक बनतो. ही कहाणी कोणत्याही सिनेमाची नसून, वास्तव जीवनातील आहे. या मुलाचं नाव आहे सुदर्शन पाटील, जो ‘रे राया’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिलिंद शिंदेच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं औचित्य साधत सुदर्शनने ‘मुंबई लाइव्ह’शी गप्पा मारताना अनपेक्षितपणे सिनेमाकडे वळण्याचा आपला अनुभव शेअर केला.


शेतकऱ्याचा मुलगा

सुदर्शन पाटील हा मूळाचा जळगाव जिल्ह्यातील बडगाव तालुक्यातील बोदर्डे गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आई गृहिणी, थोरली बहिण आणि भाऊ असा त्याचा परिवार आहे. वडील शेतकरी असल्याने अभिनयाची पार्श्वभूमी असण्याचा काही संबंधच नाही. अशा परिस्थितीत सुदर्शनने स्वत:च्या हिंमतीवर आणि सिनेमाच्या टीमच्या साथीने ‘रे राया’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.


असा आलो शिर्डीत

जळगावहून शिर्डीत येण्याबाबत सुदर्शन म्हणाला की, इयत्ता पाचवीत असताना शिर्डीतील आत्मा मालिक इंटरनॅशनल गुरुकूलमध्ये प्रवेश घेतला. दहावीपर्यंतचं शिक्षण तिथंच पूर्ण केलं. कोच अजित पवार सरांच्या सान्निध्यात राहून हाय जम्प, लाँग जम्प, रनिंगसह कबड्डीचंही प्रशिक्षण घेतलं.


अॅथलेटिक्स बनतो, पण हरिपाठ नको

खरं तर सुरुवातीला अॅथलेटिक्स बनण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. शाळेत प्रवेश घेतला तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ म्हणण्यासाठी पाठवलं जायचं. त्याचा कंटाळा आल्याने मी हरिपाठाला जायला नकार दिला. त्याबदल्यात मला अॅथलेटिक्स, हॅालीबॅाल किंवा बास्केटबॅाल यापैकी एक खेळ निवडायला सांगितलं. मी अॅथलेटिक्स निवडलं.


कधी विचारही केला नव्हता

अॅथलेटिक्स बनून १०० ते ८०० मीटरपर्यंत धावलो. हाय जम्प, लाँग जम्प यशस्वीपणे मारत स्कूल नॅशनलपर्यत खेळलो. पण सिनेमात काम करण्याचा विचार स्वप्नातही केला नव्हता. हाच खेळ पुढे मला सिनेमाच्या पडद्यापर्यंत घेऊन जाईल याची पुसटशीही कल्पना नव्हती.


निर्माता-दिग्दर्शक-लेखकांचा शोध

माझ्या खेळाचे व्हीडीओ ‘रे राया’चे लेखक किरण बेरड यांनी पाहिले होते. त्यांनी ते दिग्दर्शक मिलिंद शिंदे आणि निर्माते संजय पोपटानी यांना दाखवले. व्हिडीओ पाहून त्यांनी अजितसरांची भेट घेतली. अजितसरांनी मला सिनेमात काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि मिलिंदसरांच्या सान्निध्यात राहून अभिनय शिकलो.


सुरुवातीला धाकधूक

प्रथमच कॅमेरा फेस करताना खूप घाबरलो होतो, पण लुकटेस्टच्या वेळी हंसराज जगताप आणि विवेक चाबूकस्वार यांच्याशी झालेली मैत्री कामी आली. दोघांनीही मला खूप धीर दिला. मिलिंदसरांनी प्रत्येक गोष्ट समजावून सांगत माझ्याकडून अभिनय करवून घेतला. भूषण प्रधान आणि संस्कृती वालगुडे यांनीही खूप सहकार्य केलं.


दीड महिना पुणे मुक्कामी

‘रे राया’मध्ये काम करण्याचं नक्की झालं, तेव्हा मी दहावीत शिकत होतो. परीक्षा दिल्यावर मी दीड महिना पुण्यात मुक्काम केला. तिथे प्रोडक्शन टिमसोबत राहून देहबोली, संवादफेक आणि एकूणच अभिनयासाठी लागणारा अॅटीट्युड यांचं पूर्ण ट्रेनिंग घेतलं. संवाद कसे पाठ करायचे ते शिकलो. त्यामुळे काम सोपं झालं.


प्रेरणादायी आकाश

या सिनेमाची कथा एक कोच आणि दुर्गम भागात राहणाऱ्या तीन मुलांभोवती गुंफण्यात आली आहे. या तीन मुलांपैकी एक नेमबाज, दुसरा धावपटू आणि तिसरा कसरती करणारा आहे. त्यापैकी कसरती करणाऱ्या आकाशची प्रेरणादायी भूमिका सुदर्शनने साकारली आहे. या सिनेमात भूषण प्रधान, संस्कृती वालगुडे, उदय टिकेकर, प्रकाश धोत्रे, नयन जाधव, राष्ट्रीय पुरस्कार विजेता विवेक चाबुकस्वार आणि हंसराज जगताप यांच्याही भूमिका आहेत.हेही वाचा - 

‘बिग बॉस’मध्ये ‘मस्ती की पाठशाला

आजारानंतरचा इरफानचा पहिला फोटो व्हायरल
संबंधित विषय
ताज्या बातम्या